*हजारो क्विंटल हरभरा खरेदी शिल्लक; लेखी पत्राद्वारे पणन मंत्री जयकुमार रावल यांना केली मागणी*
परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य सरकारने शासनामार्फत महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन – नाफेड द्वारा शासकीय दराने सुरू केलेली चना (हरभरा) खरेदी २९ एप्रिल पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश होते मात्र सदर हमीभाव खरेदी पोर्टल २४ एप्रिल रोजीच बंद करण्यात आले असून शासकीय हमीभाव चना खरेदी केंद्रावर खरेदीसाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी लेखी पत्राद्वारे पणन मंत्री ना. जयकुमार रावल यांना केली आहे.
नाफेड द्वारा शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांवर प्रति क्विंटल ५,८७५ रुपये प्रमाणे चना खरेदी करण्यात येत होता. यासाठी पणन विभागाने पोर्टलवर नोंद करण्यासाठी २९ एप्रिल पर्यंत मुदत दिली होती. मात्र २४ एप्रिल रोजीच हमीभाव खरेदी करिता नोंदणी करण्याचे पोर्टल बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नोंदी करूनही हजारो क्विंटल चना (हरभरा) शिल्लक असल्याने संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
त्यामुळे शासनाचे याची तात्काळ दखल घेऊन चना खरेदीस १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्याची लेखी पत्राद्वारे मागणी धनंजय मुंडे यांनी केली असून, पणन विभाग सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
