*मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँकेत कोट्यवधींचा अपहार; मॅनेजरसह तिघांना अंबड पोलिसांकडून अटक*
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
अंबड : येथील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अंबड शाखेत ग्राहकांच्या ठेवींवर डल्ला मारून सुमारे १६ कोटी ४१ लाख ६५० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात बँकेच्या मॅनेजरसह तिघांना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. रामप्रसाद जगन्नाथ जाजू (बँक मॅनेजर)
२. अंगद येवले (कॅशियर)
३. सोमनाथ मनोहर नसवाले (शिपाई)
असा उघड झाला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, २१ एप्रिल २०२६ रोजी अंबड पोलीस ठाण्यात या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी संगनमताने बँकेत ठेवलेल्या ग्राहकांच्या मुदत ठेवी (FD) आणि लॉकरमध्ये ठेवलेले सोने व दागिने यांचा गैरवापर केला. ग्राहकांनी विश्वासाने ठेवलेल्या या रकमेचा आणि दागिन्यांचा आर्थिक अपहार करून सर्वसामान्य नागरिकांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाची कारवाई
या गंभीर प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रे फिरवण्यात आली. अखेर या प्रकरणातील मुख्य आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
“बँकेतील ठेवी आणि सोन्याच्या दागिन्यांचा गैरवापर करून हा अपहार करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, यामध्ये आणखी कोणाचे धागेदोरे आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.”
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, अंबड व त्यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
