*नगर परिषदेची सर्वसाधारण सभा : परळीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वानुमते अनेक महत्त्वाचे निर्णय !*
*_नागापूर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ १ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प, पाणी पुरवठा, मुलभूत सुविधा, अग्निशमन आदी विषयांसंबधित निर्णयांवर सभागृहात शिक्कामोर्तब_*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) —
नगर परिषद परळी वैजनाथची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या व विकासाभिमुख चर्चेच्या वातावरणात पार पडली. शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आले. सभेत सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध विधायक सूचना मांडल्या. नागापूर येथील न.प.च्या जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ १ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प, पाणी पुरवठा,मुलभूत सुविधा, अग्निशमन, सोमवारी मांस विक्री बंदी, सरस्वती नदी पुनरुज्जीवन प्रकल्प सात सदस्यीय अभ्यास समिती,आवश्यक रस्त्यांसाठी भूसंपादन प्रस्ताव करणे,आवश्यक साधनसामुग्री व मनुष्यबळ आदी सर्वंकष विषयांवर सभागृहात साधकबाधक चर्चा, संवाद व सर्वसमावेशी सुचनांनंतर महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली.
परळी वैजनाथ नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरपरिषद सभागृहात पार पडली या सर्वसाधारण सभेत विविध विषयावर सर्व सदस्यांची मते जाणून घेऊन चर्चा करण्यात आली त्यानंतर सभागृहाने अनेक महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी दिली. यामध्ये नागापूर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ नगर परिषदेच्या जागेवर १ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे ४ कोटी २ लाख ९३ हजार रुपयांच्या या प्रकल्पामुळे शहरासाठी पाणी लिफ्ट करण्यासाठी होणारा दरमहा सुमारे २७ लाख रुपयांचा वीज खर्च वाचणार असून, नगर परिषदेच्या अर्थकारणाला मोठा दिलासा मिळणार आहे.तसेच शहरातील स्वच्छता व पर्यावरण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी जेटिंग सुविधेसह ट्रक-माउंटेड पाण्याचे दोन टँकर आणि डस्ट सक्शन मशीन खरेदीस मंजुरी देण्यात आली. यामुळे सार्वजनिक स्वच्छता, वृक्षांना पाणीपुरवठा आणि अग्निशमन विभागावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
पाणीपुरवठा विभागातील वार्षिक देखभाल-दुरुस्तीची कामे तत्काळ हाती घेऊन जलपुरवठा अधिक सक्षम करण्याची मागणीही सभेत करण्यात आली.तसेच घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित उपाययोजनांबाबत माहिती देत शहरातील मूलभूत सुविधा अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शिवसृष्टी प्रकल्पासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देऊन मंजूर निधीतून काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय एमआरटीपी कायद्यानुसार विश्वकर्मा भवन ते चांदापूर रस्ता आणि भोई गल्लीतील पारंपरिक मार्ग तीर्थक्षेत्र योजनेत समाविष्ट करण्याबाबतही सभेत चर्चा झाली. वैद्यनाथ नगरीत सोमवारी मांस विक्री बंदीच्या ठरावाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.सरस्वती नदीवरील सुरू असलेल्या विकास कामांबाबत काही सदस्यांनी पर्यावरणीय दृष्टीकोनातून नदीपात्रात काँक्रिट न टाकण्याची मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत नगराध्यक्षांनी संबंधित प्रकल्पासाठी गटनेते वैजनाथ सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच पर्यावरण तज्ञांच्या सल्ल्यानुसार आवश्यक बदल शासनाला कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
अग्निशमन विभाग अधिक सक्षम करण्यासाठी अनुभवी पाच कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यामुळे आपत्कालीन परिस्थितींना अधिक प्रभावी प्रतिसाद देता येणार आहे.दरम्यान, गंगासागर नगर ४० फूट रस्ता, अंबेवेस ते चांदापूर मार्ग तसेच भाजी मंडई परिसरातील रस्त्यांसाठी भूसंपादन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेत सर्व सदस्यांनी परस्परांच्या मतांचा आदर राखत विकासाला प्राधान्य दिले. दीर्घ चर्चेनंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते मंजूर करत सभा यशस्वीरित्या संपन्न झाली अशी माहिती नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली. या सर्वसाधारण सभेला नगराध्यक्ष सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह उपनगराध्यक्षा खैसर राजा खान पठाण ,सर्व सभापती, सर्व सदस्य, सदस्या, मुख्याधिकारी, उपमुख्य अधिकारी, विभागप्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.
*तब्बल दीड तास चालली सभा; प्रदीर्घ चर्चा, अनेक सदस्यांच्या आयत्या वेळेच्या विषयांना नगराध्यक्षांनी दिली संधी*
दरम्यान आजच्या सर्वसाधारण सभेत अनेक विषयांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. तब्बल दीड तास सभागृहाचे कामकाज चालले. सर्वसाधारण सभेत प्राधान्याने विषय सूचीनुसार दिलेल्या विषयांवर आणि अध्यक्षांच्या अनुमतीने काही मोजक्या आयत्या वेळच्या विषयावर चर्चा होण्याचा प्रघात असतो. मात्र विषयसूची वरील विषयांवर साधक बाधक महत्त्वपूर्ण चर्चेला आवश्यक तो सर्व वेळ देऊन, सर्वांची मते जाणून घेऊन, सर्वांच्या सूचनांचा स्वीकार करून त्यावर आवश्यक त्या सर्व विभागांना निर्देशित करत नगराध्यक्ष सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी अतिशय प्रभावीपणे सभागृहाचे कामकाज चालवले. विशेष म्हणजे नगर परिषदेच्या इतिहासात आयत्या वेळच्या विषयांना फारसा वेळ दिला जात नाही परंतु सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेत त्यांच्या त्यांच्या प्रभागातील काही निवडक विषय मांडण्याचा दृष्टिकोनातून आयत्यावेळी आलेल्या विषयांना अनुमती देत नगराध्यक्षांनी संबंधित सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच तात्काळ त्या त्या विभागांना निर्देशित केले. लोकशाही प्रक्रियेतील अतिशय महत्त्वाच्या अशा या सर्व समावेशक कामकाज चालविण्याच्या मुद्द्याने नगराध्यक्षांनी आपल्या कामकाजाची अनोखी चुणूक दाखवून दिली.
