*न.प.अग्निशमनमध्ये ढिसाळपणा, अंबेवेस येथील पुलाच्या कामात बोगसपणा व काही अतिक्रमण कोणाच्या आशीर्वादाने? -नितीन बागवाले*

*परळी नगरपरिषद सर्वसाधारण सभेत नगरसेवक नितीन बागवाले यांचा प्रशासनावर जोरदार हल्लाबोल*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
परळी वैजनाथ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी नगराध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेस सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक नितीन बागवाले यांनी विविध मुद्द्यांवर प्रशासनाला धारेवर धरत जोरदार भूमिका मांडली.
सभेदरम्यान नगरसेवक नितीन बागवाले यांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या ढिसाळ कारभाराचा तीव्र समाचार घेतला. अलीकडील आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन दल वेळेत न पोहोचल्याचा मुद्दा उपस्थित करत, ही यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच अंबेवेस येथील सरस्वती नदीवरील पुलाच्या कामातील बोगसपणा सभागृहात उघडकीस आणत, संबंधित कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. या संदर्भात अभियंता ढवळे यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी काही स्वीकृत नगरसेवक व अध्यक्षांकडून सभा आटोपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय शहरातील सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेतील पक्षपाती कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली. काही सर्वसामान्य व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाते, तर काही ठिकाणी अजूनही अतिक्रमण कायम आहेत. ही निवडक कारवाई कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे का? असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केला. अतिक्रमणाविरोधात आम्ही नाही, मात्र कारवाई निष्पक्ष व सर्वांसाठी समान असावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. सभेत मांडलेल्या या मुद्द्यांमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *