औरंगाबादेतील करोनाबाधितांची संख्या पन्नाशी पार

औरंगाबाद : शहरातील करोनाबाधितांची संख्या आता पन्नाशीच्या पुढे गेली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास आणखी दोन जणांचे अहवाल करोना चाचणीला सकारात्मक आले. समतानगर आणि असेफिया कॉलनी या भागातील दोघी जणींना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सर्वाधिक रुग्ण समतानगर भागात सापडले असून या भागात आता नऊ रुग्ण झाले आहेत. शहरातील करोनाबाधितांची संख्या ५१ वर पोचली आहे.

गेल्या आठवडय़ापासून शहरातील विविध भागात रुग्ण आढळून येत आहेत. भावसिंगपुरा भागातील भीमनगर भागातील एका महिलेच्या मृत्यूनंतर करोना चाचणी सकारात्मक आली होती. या महिलेच्या अंत्ययात्रेस १०० हून अधिक जणांची गर्दी होती. त्यामुळे अनेक जणांच्या मनात भीती होती. मात्र, रविवारी पहाटे समतानगर आणि असेफिया कॉलनीतील दोन महिलांची चाचणी सकारात्मक आली. किलेअर्क परिसरातही शनिवारी करोनारुग्ण आढळल्याने प्रशासन हैराण झाले होते. असे असले तरी शहरात आज पुन्हा गर्दी झाली होती. रमजानपूर्व खरेदीसाठी तसेच भाजी व फळे घेण्यासाठी गर्दी होत असल्याने लोकांना आजाराची गंभीरता समजावून कशी सांगावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २२ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले असले तरी दोन जणांची भर पडत असल्याने चिंता वाढली आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात २०, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात चार रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

37 Views

Leave a Reply

Your email address will not be published.