विकास कामांचे श्रेय लाटण्याचा विरोधकांचा प्रयत्न: – नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार

देगलूर प्रतिनिधी आजीम आन्सारी देगलूर शहराच्या विविध भागाच्या विकासासाठी तब्बल १६ कोटी रुपये रुपयांचा निधी मंजूर झाला असून सर्व प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्या आहेत ; परंतु कामासाठी लागणारी वाळू, कोरोनाचे संकट, सुरु असलेली ड्रेनेजची कामे या अडचणी आहेत. लवकरच ह्या अडचणीवर मात करीत विकास कामे सुरू करण्यात येणार आहेत. अगदी कांही दिवसांपासून सुरू होणाऱ्या विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी व नगरपरिषदेला बदनाम करण्यासाठी राजकीय विरोधक प्रयत्न करीत असल्याचे नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी सांगितले. ते दिनांक २९ ऑगस्ट रोजी विरोधकांनी केलेल्या आंदोलनाचा समाचार घेताना बोलत होते. दिनांक २९ ऑगस्ट रोजी शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये हे कांही राजकीय कार्यकर्त्यांनी रस्त्यात बेशरमाची झाडे लावून आंदोलन केले. त्या संदर्भात विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार म्हणाले की, दिनांक १९ जून रोजी विशेष रस्ता अनुदानातून पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामासाठी लागणारी प्रशासकीय मान्यता आणि अन्य प्रक्रिया पूर्ण करून ३० जुलै रोजी ई निविदा काढण्यात आली आहे. 28 ऑगस्ट रोजी विशेष सभा घेऊन कामाला मंजुरी देण्यात आली आहे. ३१ ऑगस्टला वर्कऑर्डर निघणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ठोक तरतुदी अंतर्गत ५ कोटींचा निधी प्राप्त झाला असून या रकमेतून शहरांतर्गत रस्ते, नालींचे बांधकाम करण्यात येणार आहे. याच कामासाठी आणखी ३ कोटी निधी प्राप्त झाला असून त्यातूनही शहरातील नाली आणि रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी देण्यात येणारे ३ कोटींचे विशेष अनुदान नगर परिषदेला प्राप्त झाले आहे. या अनुदानातून करडखेड येथील जलशुद्धीकरण केंद्र ते वाय टी पॉइंटपर्यंत पाईपलाईन, नवीन जॅकवेलचे बांधकाम, जलशुद्धीकरण केंद्राजवळ शुद्ध पाणी व अशुद्ध पाणी पंपिंगसाठी मोटर बसवणे, नवीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी क्लॅशिप फॅक्युलेटरचे बांधकाम करण्यात येणार आहे. यातील कांही कामे झाली असून उर्वरित प्रगतीपथावर आहेत. अशा प्रकारे शहराच्या सर्व प्रभागांबरोबरच करडखेड येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विकास कामासाठी एकूण १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या ड्रेनेजचे काम होत आहे. वाळू उपलब्ध नाही, कोरोनाचे संकट सुरु आहे. या सर्व अडचणींवर मात करीत लवकरच विकास कामे सुरू केले जाणार आहेत. शहरात विकासकामे सुरू होणार असल्याचे समजताच कांही राजकीय विरोधक आंदोलनाचे नाटक करून विकास कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार म्हणाले.

68 Views

Leave a Reply

Your email address will not be published.