आरळी येथील नाल्यात बुडून मेंढपाळाचा मृत्यू

कुंडलवाडी  (प्रतिनिधी) –  बिलोली तालुक्यातील आरळी गावाशेजारी असलेल्या नाल्यात पाण्याचा अंदाज न आल्याने हाजप्पा गणपती बनसोडे ( वय ४२ ) या मेंढपाळाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली . आरळी येथील मेंढपाळ हाजप्पा बनसोडे व त्यांचा मुलगा वैभव बनसोडे हे दोघे मेंढ्याना चारण्यासाठी घेऊन जात असताना , आरळी – कुंडलवाडी रस्त्यावरील आरळी येथील पुलाजवळील बंधाऱ्याच्या ढोहात मेंढ्यांना पोहणी घालण्यासाठी घेऊन गेले . पोहून वर आलेल्या काही मेंढ्यांना रस्त्याच्या बाजूला थांबविण्यासाठी मुलगा वैभव बनसोडे पुलापासून पुढे गेला . परंतु , काही मेंढ्या पाण्यातून बाहेर येत नसल्याने व ते बुडत असल्याचे पाहून हाजप्पा बनसोडे यांनी पाण्यात उडी घेतली . मेढ्यांना बाहेर काढण्याचा नादात अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले . वडील बुडत असल्याचे पाहून वैभवने पुलाशेजारील शेतकऱ्यांना बोलावले . काही वेळानंतर त्यांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले . बिलोली ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ . कैलास शेळके यांनी मृत झाल्याचे घोषित केले . मयताचे वडील गणपत बनसोडे यांच्या फिर्यादीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली . पुढील तपास बिलोली ठाण्याचे बीट जमादार गोविंद शिंदे करत आहेत . हाजप्पा बनसोडे यांच्यावर १८ जुलै रोजी दुपारी आरळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . त्याच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे .

248 Views

Leave a Reply

Your email address will not be published.