अंबाजोगाईत मजुरांना मारहाण ; १५ हजारांची लुट !!

अंबाजोगाई : शीतपेय पिण्यासाठी साकूड रोडवरील खंडोबा मंदिराच्या परिसरात बसलेल्या दोघा मजूरांना सहा जणांनी मारहाण करून त्यांच्याजवळील १५ हजार रूपये काढून घेतले. सोमवारी दुपारच्या या घटनेनंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करून रात्री उशीरा लुटीत सामील असलेल्या तिघांना बेड्या ठोकल्या.

अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांडा येथील रवि नागनाथ आडे हा अन्य एकजणासोबत सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास शीतपेय पिण्यासाठी अंबाजोगाईलगतच्या साकूड रोडवर खंडोबा मंदिराजवळ बसला होता. यावेळी सहा जण रिक्षातून तिथे आले. रवि आणि त्याच्या सहकाऱ्याला मारहाण करत त्यांनी दोघांजवळील एकूण १५ हजार रूपये काढून घेतले. रवीने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असाता ते सर्वजण रिक्षात (एमएच २३ एक्स २३३८) बसून दरीच्या दिशेने पळून गेले. त्यानंतर रवी आडे याने शहर पोलीस ठाण्यात जाऊन लुटीची तक्रार नोंदविली होती. कलम ३९५ अन्वये गुन्हा नोंद करून तपास पोलीस उपनिरिक्षक सुचिता शिंगाडे यांच्याकडे देण्यात आला.

अवघ्या काही तासात तिघे गजाआड
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, निरिक्षक सिद्धार्थ गाडे आणि उपनरिक्षक सुचिता शिंगाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासाची चक्रे वेगाने फिरवत शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात अविनाश बालासाहेब जोगदंड, कृष्णा मनोहर जोगदंड आणि अमोल मनोहर जोगदंड (सर्व रा. परळी वेस, अंबाजोगाई) या तिघांना बेड्या ठोकल्या. उर्वरित आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

दोन दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, मंगळवारी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. तिघांनाही न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

44 Views

Leave a Reply

Your email address will not be published.