मंठा गट विकास अधिकारी संजय पाटील निलंबित
मंठा (प्रतिनिधी) – पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय मधुकरराव पाटील यांच्या विरुध्द तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्य शासनाचे अव्वर सचिव स.ह.धुरी यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून या कारवाईमूळे अधिकारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, कार्यालयात वारंवार अनुपस्थित राहणे,वरीष्ठ अधिकार्यांच्या बेठकीला गैरहजर राहणे, कार्यालयात मद्यप्राशन करून येणे इत्यादी गंभीर बाबी निदर्शनास आल्यामुळे गटविकास अधिकारी संजय पाटील यांच्या विरुध्द कारवाई करण्याचा प्रस्ताव जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्य सरकारकडे पाठविला होता. राज्य सरकारने याप्रकरणी गांभीर्याने दखल घेत पाटील यांच्या विरुध्द तडकाफडकी निलंबनाची कारवाई करून त्याबाबतचे आदेश काल मंगळवारी सायंकाळी उशिरा बजावले आहेत.