‘पीबीएन शॉप’ अॅपद्वारे किराणा मालासोबतच आता भाजीपालाही करा ऑनलाईन खरेदी
परभणी : कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना घरबसल्या जीवनावश्यक किराणा मालाची गरज लक्षात घेवून परभणी शहरातील नागरिकांसाठी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांच्या संकल्पनेतून ” पीबीएन शॉप ” हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले होते. नागरीकांच्या आणखी सुविधेसाठी या अॅपमध्ये सुधारणा करण्यात आली असून याद्वारे आता किराणा मालासोबतच भाजीपाला देखील ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी या प्रणालीचा वापर करावा आणि लॉकडाऊन कालावधीत घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे. मोबाईल अॅपमध्ये भाजीपाला नावाचा स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यात आलेला आहे. सध्याच्या अॅप धारकांना ही सुविधा वापरासाठी नव्याने डाऊनलोड करावयाची आवश्यकता नसून त्यांना फक्त त्यांच्याकडील ॲप अपडेट करावे लागणार आहे . नवीन डाउनलोड करणाऱ्यांना सुधारीत आवृत्तीच डाऊनलोडद्वारे उपलब्ध होईल. किराणा मालासोबतच आता परभणीच्या नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी देखील घराच्या बाहेर पडण्याची गरज नाही. गूगल प्ले स्टोअरवर हे ॲप विनामूल्य उपलब्ध आहे. अँड्रॉइड मोबाईल धारक हे ॲप वापरू शकतील तसेच संगणकावर www.pbnshop.in द्वारे देखील ही प्रणाली वापरता येणार आहे . सदर सेवा ही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत पुरविण्यात येत असून या मोबाईल ॲप आणि संगणक प्रणालीची निर्मिती व विकासकार्य परभणीचे ई – कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज आणि ” मॅप ऑन ” कंपनीचे सी.ई .ओ. सचिन देशमुख व प्रविण बाळासाहेब देशमुख यांच्यावतीने विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ( NIC ) परभणीचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संगणक प्रणालीचा विकास केला आहे. आज दि. २४ एप्रिल २०२० पासुन ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असन या प्रणालीद्वारे नागरिकांना आवश्यक किराणा मालाप्रमाणेच भाजीपाल्याची ऑर्डर दिल्यानंतर २४ तासाच्या आत ऑर्डरची घरपोच सेवा देण्यात येणार आहे . ऑर्डर देतांना नागरिकास त्याचा मोबाईल क्रमांक आणि संपूर्ण पत्ता स्पष्टपणे नमूद करावयाचा आहे. भाजीपाल्याच्या भावातील चढ- उतार लक्षात घेता ऑर्डर देतांना नागरिकांना त्याच्या भाजी पाल्याची अंदाजीत किंमत अॅपमध्ये दिसते परंतू प्रत्यक्ष बाजारात असलेल्या किंमतीत तफावत असू शकते परंतू ऑर्डर घरपोच देतांना प्रत्यक्ष बाजारपेठेतील दराप्रमाणे पावती देण्यात येणार आहे आणि नागरीकांनी त्या पावतीनुसार रक्कम अदा करावयाची आहे. घरपोच सेवा पुरविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतलेला असून त्यांच्या स्वयंसेवकांमार्फत ही सेवा विनामुल्य देण्यात येणार आहे . त्याकरीता कोणतीही अधिकची रक्कम बिलात लावण्यात येणार नाही. परभणी शहरातील नागरिकांनी “ पीबीएन शॉप ” अॅपला चांगला प्रतिसाद दिलेला असून दि. २४ एप्रिल २०२०पर्यंत या अॅपमध्ये ५८६ नागरिकांनी नोंदणी केलेली असून १६५ ऑर्डर्स भरल्या असून त्या पैकी दि. २२ एप्रिल पर्यंत १३१ ऑर्डर घरपोच डिलिव्हरी करण्यात आलेल्या आहेत. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, परभणी यांनी कळविले आहे.