नोकराचा मालकाच्या गल्ल्यावर गेला डोळा अन् शहर पोलिसांनी लावला छडा !!
उदगीर : सध्याच्या काळात झटपट पैसे कमावून श्रीमंत व्हावे, तेही विनासायास. अशी प्रवृत्ती वाढू लागली आहे. यामध्ये कामचुकार आणि श्रमप्रतिष्ठा न जाणणारे तरुण जास्त प्रमाणावर आढळून येत आहेत. उदगीर शहरातील अशाच एका घटनेने शहरातच नव्हे तर जिल्ह्यात चर्चेला ऊत आला आहे.
यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, उदगीर शहरातील सोन्या-चांदीचे जुने व्यापारी अंजय्या आगय्या उनापरती या सराफ व्यापाऱ्याच्या दुकानावर एक नोकर काम करत होता. आपला मालक 67 वर्षाचा आहे. त्याला जास्त काही लक्षात येणार नाही. असे वाटल्याने अंजय्या ज्वेलर्स येथे मुनीम म्हणून काम करणाऱ्या नोकराने दुकानातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम, ज्यामध्ये दोन तोळे सोन्याचे छोटे मंगळसूत्र किंमत अंदाजे 80000, कानातील झुमके 3800 मिलीग्राम किंमत पंधरा हजार रुपये, नाकातील नथनी 2700 मिलिग्रॅम वजनाचे किंमत दहा हजार आठशे, दोन सोन्याच्या अंगठी 5900 मिलिग्रॅम किंमत तेवीस हजार सहाशे, सोन्याचे पान अकराशे मिली ग्रॅम वजनाचे किंमत चार हजार चारशे रुपये, नवग्रहांची सोन्याच्या अंगठी दहा ग्रॅम वजनाची किंमत 40 हजार रुपये, डायमंड सह सोन्याच्या पाच अंगठ्या प्रत्येकी पाच पाच ग्रॅम वजनाचे किंमत 2 लाख 50 हजार रुपये, जुन्या जमान्यातील सोन्याचे सहा शिके 60 ग्रॅम वजनाचे किंमत दोन लाख 40 हजार रुपये व नगदी रोख एक लाख 50 हजार रुपये. असे एकूण आठ लाख 13 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल डायमंड सह चोरून घेऊन गेले. अशी फिर्याद अंजया उनापरती यांनी शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरून गु.र.नं. 124/ 20 कलम 381, 461 भारतीय दंड विधान संहिता अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील प्रकरणी रतिक किशोर कांबळे वय 21 वर्ष राहणार किल्ला गल्ली उदगीर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सदरील प्रकरणातील इतर आरोपीही निष्पन्न झाले. यामध्ये सचिन शिवाजीराव पांचाळ वय सत्तावीस वर्ष रा. लोणी तालुका उदगीर, बालाजी भानुदास चन्नावार वय 55 वर्ष, स्वप्निल बालाजी चन्नावार 23 वर्ष दोघे राहणार येरमेनगर तालुका उदगीर यांना अटक करून पोलीस कस्टडीत ठेवून चौकशी केली असता, आणखी एक आरोपी विजय बजरंग कदम वय तीस वर्ष राहणार कदम गल्ली तालुका पलुस जिल्हा सांगली हाल मुक्काम पेन्सिलवार गल्ली, उदगीर यालाही अटक केली. त्यांच्याजवळून सोन्याचे दागिने किंमत सहा लाख तीस हजार आठशे इतका मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणातील तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एम. एम. शर्मा यांच्याकडे होता. आता नूतन आलेले पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण हे या प्रकरणाचा पुढील तपास करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा देतील. आणि घरफोड्या, दुकान फोड्या, चोऱ्या,मारामाऱ्या याच्यावर आळा आणतील. अशी अपेक्षा उदगीरकर व्यक्त करत आहेत.