गेवराई तहसीलदार जाधवर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न ; वाळूने भरलेल्या हायवाची पाठीमागून धडक !!
गेवराई : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तहसीलदारांच्या कारला हायवाने मागून जोराची धडक दिल्याची घटना गुरुवारी (ता. ११) सायंकाळी तालुक्यातील गढीजवळ घडली. या घटनेत तहसिलदार प्रशांत जाधवर बालंबाल बचावले.
दरम्यान, घटनेनंतर जिल्हाधिकारी राहूल रेखावार तत्काळ घटनास्थळी पोहचले असून उशिरापर्यंत ते तिथे थांबून होते. आरोपीला तत्काळ अटकेच्या सुचनाही त्यांनी दिल्या.
गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. अनेक वेळा कारवाया होत असल्या तरी महसूल व पोलिस यंत्रणेतील मंडळींच्या जाणिवपूर्वक दुर्लक्षामुळे वाळू माफिये बेफाम झालेले आहेत. त्यातूनच अगदी तहसिलदारांच्या वाहनाला धडक देण्यापर्यंतचे धारिष्ट्य येण्यापर्यंत माफियांची मजल गेली आहे. काही राजकीय पदाधिकाऱ्यांसह महसूल व पोलिसांनीही नातेवाईकांच्या नावे असे हायवा खरेदी करुन त्यातून हा गोरखधंदा सुरु आहे.
बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पाडळसिंगी ते पाचेगाव एक हायवा वाळू वाहतूक करताना पकडला होता. यावेळी वाळू माफियांनी तहसीलदार यांच्या गाडीला त्यांची गाडी आडवी लावून पकडलेला हायवा पळविला होता. याप्रकरणी तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यातच गुरुवारी पुन्हा तहसीलदार यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली.