🙏”साधु ओळखावा मरणी|” 🙏 वै.

ह.भ.प. निर्गुण महाराज कातकडे ,उंडेगावकर यांना नुक्तिच देवाज्ञा झाली आणि सारा वारकरी संप्रदाय हळहळला. निर्गुण महाराज हे साऱ्या वारकऱ्यांचे भूषण होते.पंढरपुरचा पांडूरंग हे आनंद प्रतितीचे व्यक्त रुप आहे ज्यांच्या संगतीत आनंद प्रतिती प्रेमप्रतीती भोगता येते तो पंढरीचा निका वारकरी . निर्गुण महाराज यांची बालपणापासून ईश्वरनिष्ठा असल्यामुळे त्यांना अनेक संताचा सहवास लाभला, त्यांचे वडील पण निष्ठावंत वारकरी होते .त्यांचे गुरु वै.मारोती महाराज दस्तापुरकर. लहानपणी त्यांनी जवळ जवळ १२ वर्षे म्हणजे एक तप मारोती महाराजांची गाडी चालवून, त्यांची सेवा करून केला. लहानपणीच त्यांना मिळालेल्या संतसंगामुळे त्यांच्या जीवनावर असा परिणाम झाला की ते संत झाले, दासांचे दास झाले, आळीची भींगुरटी झाले . त्यांच्या जीवनात संतसंगामुळे हे परीणाम झाले हे म्हणने बरोबर आहे तरी पण अनेकजण संतसंगती भेटून सुद्धा संतपदाला जात नाहीत. कोंडोपंत हे तुकाराम महाराजांचे १४ टाळकऱ्यांपैकी एक. ते सतत तुकाराम महाराजांच्या सहवासात होते .पण त्यांना याञेसाठी तुकाराम महाराजांनी एक होन दिला होता. तो होन मोडून अर्धा खर्च करायचा व एक रुपया शिल्लक ठेवायचा. दुसऱ्या दिवशी उर्वरित रुपयाचा होन होत असे. अशाप्रकारे त्यांनी सर्व याञेमध्ये खर्च केला व होन परत करण्याची वेळ आली तेव्हा तो हरवला असे खोटे तुकाराम महाराजांना सांगितले. हा इतिहास आपणास माहितच आहे. तात्पर्य काय. संतसंगतीत राहून कोंडोपंतात काय बदल झाला आणि असे किती कोंडोपंत असतील जे संतसंग करुन कोरडेच आहेत. यास्तव निर्गुण महाराजांबद्दल एवढच म्हणायच आहे की त्यांच्या पुर्वपुण्याईमुळे व पुर्वकर्मामुळे त्यांना संतसंगती लाभली. नंतरच्या काळात ते माऊली महाराज अरबुजवाडीकर यांच्यासोबत १२ वर्षे होते व नंतरच्या काळात ह.भ.प.केशव महाराज उखळीकर यांच्यासोबत १२ वर्ष त्यांनी काढले व नंतरही ते उखळीकर महाराजांच्या सानिध्यात होते. महाराष्ट्रात आसा कोणी नामवंत कीर्तनकार नसेल ज्यांचा सहवास निर्गुण महाराजांना लाभला नाही. ते स्वतःला मी सेवेकरी आहे असे म्हणत असत. आयुष्यभर त्यांनी भजन केल, कीर्तन केले. ते नेहमी प्रसन्न असायचे. देखे अखंडित प्रसन्नता। आथी जेथ चित्ता।। तेथे रिगणें नाही समस्ता। संसार दुःखा।। जैसा अमृताचा निर्झारु। प्रसवे जयाचा जठरु।। तया क्षुदेतृषेचा अडदरु। कांहीची नाही।। तैसे हृदय प्रसन्न होय। तरी दु:ख कैचे के आहे।। तेथ आपैसी बुध्दी राहे। परमात्मरुपी।। अशी निखळ, निरागस, नि:स्वार्थ, निराभिमानी प्रसन्नता निर्गुण महाराजांच्याठायी असे. ते ईश्वरनिष्ठ होते त्याचबरोबर व्यवहारनिष्ठ होते. त्यांच्यातील सत्यनिष्ठा, प्रमाणीकपणा, निराभिमानी गुण अलौकिक होते. माऊली म्हणतात -“जयाचे ऐहिक धड ना ही। पार्था तयाचे परञ पुससी काही।।’ अर्थात ज्यांना मुळात नश्वर असा संसार अर्थात व्यवहार करता येत नाही त्यांना शाश्वत ईश्वराबद्दल काय जाणता येईल. ज्याला नाटकात एखादे पाञ निट करता येत नाही त्याला वास्तवात ते पाञ करतायेईल का? निर्गुण महाराज हे अत्यंत वास्तववादी होते. आपल्यापासून कुणाला ञास होणार नाही याची त्यांना नेहमी चिंता वाटायची. आयुष्यभर त्यांनी कुणाला ञास होईल असे वागलेत असे माझ्या पाहण्यात नाही आणि मृत्यूनंतरही त्यांनी कुणाला ञास दिला नाही . ‘ साधु ओळखावा मरणी| शुर जाणावा रणी॥’ याचा अनेकजण अनेक अर्थ काढतात. साधू हा आजाराने मरत नाही, तो लवकर मरतो अर्थात त्याला मृत्युयातना होत नाहीत, तो घरीच मरतो बाहेर मरत नाही असे समज गैरसमज समाजात आहेत. मला हा प्रश्न पडायचा पण माझं समाधान होत नसे कारण यातलं बऱ्याच संतांना लागू पडत नाही. ह.भ.प.वै. सोनोपंत महाराज दांडेकर यांच्या किर्तनामधुन त्यांनी “साधु ओळखावा मरणी| शुर जाणावा रणी॥” याचा अर्थ सांगितला तो मला पटला. त्यांच्यामते जो साधू मरेपर्यंत साधुत्व टिकवतो, मरेपर्यंत ज्यांच्यामध्ये काही बदल होत नाही किंवा ज्यांच्या हातून काही अनिष्ठ पापकर्म घडत नाही तोच खरा साधू. बरेच साधू आसतात आगोदर रामराम जपतात मग आसाराम होतात आशा अर्थानं ‘साधु ओळखावा मरणी’ असं म्हटलं आहे. कोणाला अपघात झाला, कोणी कोणत्या कारणाने देह ठेवला हे महत्त्वाच नाही किंवा कोणाचा अंतीमसोहळा चांगला झाला म्हणून तो साधू नाही. नाहीतरी जे अंतिमसोहळा होतो तो तरी विधिवत किती जणांचा होतो हा ही प्रश्नच आहे. तसं पाहिल तर संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले त्यांचे अंत्यसंस्कार कसे झाले. नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली त्यांचा अंत्यसंस्कार सोहळा कुठे झाला. अनेक नाथपंथी साधू कुठे समाधिस्थ झाले याचे आज ही वाद आहेत. यावरून एवढेच सिध्द होते की ‘साधु ओळखावा मरणी’ म्हणजे मरेपर्यंत साधुवृत्तीने जगणं एवढच. आणि आपले निर्गुण महाराज खरोखरच साधुवृत्तीने मरेपर्यंत जगले हे सत्य आहे . ह. भ.प. बाबा महाराज सातारकर, पं. यादवराज फड, ह.भ.प.ढोक महाराज , ह.भ.प.बाबा महाराज इंगळे, भगवान गडावरचे ह.भ.प. नामदेव शास्ञी महाराज, आळंदीचे ह.भ.प. कुरेकर महाराज, ह.भ.प. घुले महाराज(गाथा मंदिर), ह.भ.प.वासकर महाराज, ह.भ.प.राऊत महाराज , ह.भ.प. बंडातात्या कराडकर, ह.भ.प.अर्जुन महाराज लाड असे किती तरी संत महंत यांनी निर्गुण महाराजावर पुञवत प्रेम केल आहे हे मी पाहिले आहे. त्यांच्या अनपेक्षित जाण्याने ही सारी मांदियाळी हेलाऊन गेली, हळहळली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना. ○ डॉ. अरूण गट्टे परळी वै.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *