सोशल डिस्टंसला जालन्यात खो; तळीरामांची वॉईनशॉपवर गर्दी
जालना (प्रतिनिधी) – कोरोना या संसंर्गजन्य रोगाने संपुर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात थैमान घातले असल्याने शासनाच्या वतीने लॉकडाऊनचे आदेश लागू करण्यात आले आहे. या दरम्यान जीवनाश्यक वस्तूच्या दुकानांना काही अटींसह शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यातच जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शुक्रवारी (दि 15) ऑनलाईन मद्य विक्रीसाठीही काही अटी-शर्तीसह परवानगी दिलेली आहे. यावर शनिवारी ऑनलाईन मद्य विक्री सुरु करण्यात आली. मात्र, या ऑनलाईन विक्रीचा संपूर्णतः फज्जा उडाला असून अनेक मद्य व्यवसायिकांनी चढ्या भावाने ऑफलाईन विक्री केल्याने मुळ परवानाधारक ग्राहकांची गैरसोय झाली आहे, याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. संबंधीत दुकानदारांनी दिलेला संपर्क दुरध्वनी (7756084076) हा शहरातील दिपक वॉईन शॉप च्या बोर्डावरील नंबर बंद असल्याने परवानाधारक नागरीकांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली होती. त्यामुळे लोक वॉईन शॉप समोर विचारपुस करण्यासाठी गर्दी करू लागले होेते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टंस या लोकांकडून पाळण्यात आले नाही.
यासंदर्भात पोलीसांना माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर यांच्यासह कर्मचार्यांचा फौजफाटा दुपारी 12 वाजेच्या सुमारास अलंकार चित्रपट गृहासमोरील बरजोर अँड संस वाईन शॉप हे दुकान उघडलेले होते त्या ठिकाणी गर्दी असल्याने पोलिसांना पाहताच गर्दी केलेले सर्वजण पळून गेले. त्या गडबडीत दुकानातील एका नोकरानेदेखील दुकानाला बाहेरून कुलूप लावून पोबारा केला. बंद करून गेलेल्या दुकानात काही माणसे असल्याचा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी आतील लोकांना पळून गेलेल्या नोकरास बोलावून घेण्यास भाग पाडून दुकान उघडले. त्यावेळी दुकानात मालक व नोकर असे पाच जण आढळून आले. पोलीस कर्मचारी सुधीर वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दीड महिन्यांपासून लॉकडाऊन अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे जालना शहरासह जिल्हाभरातील विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद होती. परंतू शासनाने ऑनलाईन मद्य विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, लॉकडाऊन अद्यापही हटविण्यात आलेले नाही. तथापि लॉकडाऊनच्या काळातील बंदचा फायदा घेण्याच्या उद्देशाने जालना शहर परिसरातील वाईन शॉप आणि बिअर शॉप व्यावसायिक मद्यचा काळाबाजार करीत आहेत. प्रामूख्याने परवाना धारकांनाच ऑनलाईन टोकन घेतल्यानंतर मद्य विक्रीची परवानगी दिली असतांना या वाईन शॉप आणि बिअर शॉपी व्यवसायिकांकडून सर्रास काळा बाजार करण्यासाठी कुणालाही मद्याची विक्री केली जात आहे. ही बाब दुकानांवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यास निश्चितच लक्षात येईल. शिवाय शनिवारी दुपारी काही व्यवसायिकांनी मनमानी पद्धतीने मद्याची विक्री करून अचानकपणे स्टॉक संपल्याचा कांगावा केला. व दुकाने बंद केली. त्यामुुळे लॉकडाऊनच्या काळात मद्याचा काळा बाजार करण्यासाठी व्यवसायिकांकडूनच पाठबळ दिले जात आहे. मद्य विक्रीसाठी घालून देण्यात आलेल्या कुठल्याही नियमांचे या व्यवसायिकांनी पालन केलेले नाही. शिवाय चढ्या भावाने आणि मनमानी पद्धतीने मद्य विक्रीचा प्रताप या वाईन शॉप आणि बिअर शॉपी व्यवसायिकांनी केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून या सर्वांचे रेकॉर्ड प्रशासनाने तपासणे आवश्यक आहे. काळा बाजार करून आर्थिक मलिदा लाटण्याचा या मद्य विके्रत्यांचा प्रयत्न असून या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. जालना शहरातील सर्व वाईन शॉप आणि बिअर शॉपींची तपासणी व चौकशी करावी तसेच दोषी आढळून येणार्यांना कुठल्याही परिस्थितीत पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.