जेष्ठ समाजसेविका अपर्णताई अरुण रामतीर्थकर यांचे आज निधन
सोलापूर : ज्येष्ठ समाजसेविका आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे मंगळवारी म्हणजेच 28 एप्रिल रोजी निधन झाले आहे. त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अपर्णा रामतीर्थकर या चांगल्या वक्त्या होत्या आणि त्यांची मते त्या परखडपणे मांडत होत्या. या मतांमुळे काही वेळा वादही निर्माण झाला होता. ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत्या. सोलापुरातील पाखर संकुल या अनाथ मुलांच्या वसतीगृहाच्या उभारणीत त्यांचा सहभाग होता. संस्कारभारतीच्या माध्यमातून त्यांनी सोलापुरात काम केले होते. बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या.
कुटुंब, संस्कार याबाबत त्यांनी राज्यात आणि देशात ठिकठिकाणी जाऊन त्यांची मते मांडली होती. अनेक जोडपी विभक्त होण्यापासून त्यांनी वाचवले होते. समुपदेशनातून त्यांनी दुभंगलेली मने जोडण्याचा प्रयत्न केला होता. आई-वडिलांनी मुलांवर संस्कार घडवावेत. संस्कार घडविण्यात आणि संस्कृती रक्षणात आईची भूमिका महत्वाची असते, असे मत अॅड. अपर्णा रामतीर्थकर या सातत्याने मांडत होत्या. एकत्र कुटुंबपद्धत ही संकल्पना ही हरवत चालली असून विभक्त कुटुंबपद्धत प्रचलित होत आहे. प्रत्येक कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे अशा स्थितीत कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या नात्याशी असलेली बांधिलकी कायम ठेऊन नाते संबंध मजबूत करा, नाते जपा, कुटुंब जपा असेही मत त्यांनी अनेकदा प्रगट केले होते.