शेतकऱ्यां प्रति सहानुभूती मात्र व्यापाऱ्यांना बंदचे दडपण नको: राजेश राऊत
जालना ( प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे तयार केले असून विरोधकांकडून या कायद्याचा विपर्यास करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. शेतकऱ्यां प्रति सहानुभूती असून उद्याच्या बंदमध्ये स्वेच्छेने सहभागी न होणाऱ्या व्यापारी बांधवांवर बंद चे दडपण लादू नये असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राजेश राऊत यांनी म्हंटले आहे की ,तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात शेतकरी कायद्यांचा मसुदा तयार झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हे कायदे लागू करत आहेत. असे सांगून राजेश राऊत म्हणाले, कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या लॉक डाऊन च्या संकटात आधीच व्यापारी बांधवांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून मोठी आर्थिक हानी झाली.ठप्प झालेली व्यापारपेठ हळूहळू सुरळीत होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या पुकारलेल्या बंदमध्ये जे व्यापारी बांधव स्वेच्छेने सहभागी होतील त्यांना होऊ द्यावे तथापि जे व्यापारी होणार नाहीत त्यांच्यावर जबरदस्ती करू नये, दुकानात जाऊन कुठलेही आर्थिक व अन्य नुकसान होणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल याची खबरदारी घ्यावी. असे आवाहनही राजेश राऊत यांनी केले आहे. _______
