वैद्यकीय अधिक्षक व प्रसिद्ध सर्जन डॉ.रामेश्वर लटपटे यांचे दुःखद निधन; शुक्रवारी सकाळी होणार अंत्यसंस्कार

परळी : परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक व प्रसिद्ध सर्जन डॉ.रामेश्वर रामकिशन लटपटे (वय 52) यांचे पुणे येथील सह्याद्री इस्पिताळात उपचारादरम्यान गुरूवारी (ता.4) सायंकाळी पाचच्या दरम्यान निधन झाले. शुक्रवार (ता.5) सकाळी साडेआठ वाजता परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉ.लटपटे यांच्या निधनाने परळी शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ.लटपटे हे गेल्या कांही दिवसापासून आजारी होते. त्यांना गेल्या महिन्यात उपचारासाठी हैद्राबाद येथे हलवण्यात आले होते. तेथून उपचार घेवून ते परळीत आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात रूजू झाले. प्रकृती ठीक नसतांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदभार घेतला. कोरोनाच्या या लढाईत त्यांनी येथे फार मोठे योगदान दिले. परंतु प्रकृती साथ देत नसल्याने पुन्हा उपचारासाठी त्यांना पुणे हलवण्यात आले. पुणे येथील सह्याद्री इस्पिताळात उपचार चालू असताना गुरूवारी (ता.4) सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गेल्या वीस वर्षापासून डॉ.रामेश्वर लटपटे येथे स्थायिक होते. ते कोद्री (ता.गंगाखेड) येथील रहिवासी होते. एक चांगला सर्जन म्हणून त्यांची ख्याती होती. अनेक गंभीर रूग्णांवर अवघड शस्त्रक्रिया करुन अनेकांना त्यांनी जीवदान दिले आहे. त्यांच्या दुःखद निधनाने परळीसह जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ.रामेश्वर लटपटे यांच्या मागे आई, वडील, तीन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *