लाॅकडाऊन मुळे पायी जाणाऱ्यांना मालगाडीची धडक; 14 मजुरांचा मृत्यू, तर दोन जण जखमी

जालना : राज्यात कोरोनाचा विळखा वाढतच जात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे अनेक मजूर देशभरातील अनेक राज्यांत अडकून पडले आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे अनेक मजुरांनी पायी प्रवास करणं पसंत केलं आहे. अशातच कोरोनाच्या संकटात मजुरांशी संबंधित एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. महाराष्ट्रातील औंरगाबादमध्ये मालगाडीच्या धडकेत 14 मजुरांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. रेल्वे रूळावरून पायी जात असताना मालगाडीने या मजुरांना धडक दिली. जालना-औरंगाबाद मार्गावर करमाडजवळ हा अपघात घडला. हे सर्व मजूर जालन्यातून भुसावळला जात असतानाच पहाटे चार वाजता ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

सर्व मजूर जालन्यातील एका खाजगी कंपनीत काम करत होते. रात्री जालन्याहून भुसावळला निघाले असून तिथून ते आपल्या गावी छत्तीसगढला जाणार होते. लॉकडाऊनमुळे आपल्या गावी जाण्यासाठी त्यांनी रात्री पायी प्रवास सुरु केला होता. रस्त्यात थकल्यामुळे ते रेल्वे रूळावरच थांबले आणि तिथेच झोपून गेले. गाढ झोप लागल्यामुळे मालगाडी येत असल्याचं त्यांना समजलं नाही. अशातच जालन्याकडून औरंगाबादकडे येणाऱ्या मालगाडीने या मजुरांना धडक दिली. एकूण 19 मजूर असून त्यातील 16 मजुरांना मालगाडीने धडक दिली. त्यामध्ये 14 मजुरांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. तर तीन मजूर बचावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *