LatestNewsमहाराष्ट्र

राज्यातील शाळांचा शैक्षणिक प्रवास ई-लर्निंग कडे

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत सध्या जगभरातील नोकरदार, व्यावसायिकांना ज्याप्रमाणे घरूनच काम करण्याचा पर्याय स्वीकारला, त्याचप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासही बहुतेक घरूनच करावा लागण्याची चिन्हे आहेत. सरकारच्या शिक्षण आणि क्रीडा विभागाने नुकताच एक शासन निर्णय जाहीर करून याबाबत स्पष्टता दिली आहे या शासन निर्णयानुसार विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी अध्ययनासाठी ई-लर्निंगच्या विविध पर्यायांचा वापर करावा, असे सुचविण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर ठेवावे लागणार असून, शाळांमध्ये ते अशक्य असल्याने घरून अभ्यास करण्याचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. *पुढील शैक्षणिक वर्षात शाळा नक्की कधी सुरू होणार, सामाजिक वावराचे नियम पाळून वर्ग कसे भरणार, हे सारे प्रश्न आता तरी अनुत्तरित आहेत.अशा परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध असणाऱ्या विविध ई-लर्निंग सुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. त्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनीही पुढाकार घ्यावा, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.* २८ एप्रिलला प्रसिद्ध केलेल्या या परिपत्रकात ‘कोव्हिड-१९’ या विषाणूमुळे उद्भविलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना पुढील काही काळ घरीच राहून अभ्यास करावा लागेल, ही वस्तुस्थिती अधोरेखित करण्यात आली आहे. यासाठी बालभारतीचे ॲप,दिक्षाॲप या पर्यायांचा विचार करावा, असे सांगितले आहे.यामध्ये विद्यार्थ्यांना विविध पुस्तके डाऊनलोड करण्यापासून ते विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिंगचे पर्यायही देण्यात आले आहेत. तसेच बालभारतीच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना बोलकी पुस्तकेही उपलब्ध होणार आहेत. याबाबत शासन निर्णयात घरच्या घरी अभ्यास करता येईल, अशा विविध पयार्यांची माहिती देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने दिक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून पहिली ते दहावीपर्यंतच्या इयत्तांचे मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील नऊ हजारांहून अधिक ई-लर्निंग साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्यात दृकश्राव्य शैक्षणिक माहितीपट, बौद्धिक खेळ आदी नाविन्यपूर्ण प्रणालींचा समावेश आहे.पहिली ते बारावीच्या क्रमिक अभ्यासक्रमाची सारी पाठ्यपुस्तके बालभारतीच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत. ती डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल. या परिपत्रकात ई-लर्निंगचे पर्याय उपलब्ध असणाऱ्या सर्व वेबसाइटची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्याचा वापर करून स्वयं अध्ययन पद्धतीने घरच्या घरी अभ्यास करावा, असेही शासन निर्णयात सुचविण्यात आले आहे._

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *