राजकारण बाजूला ठेवत धनंजय मुंडेंनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास राज्य सरकारकडून १०.७७ कोटींची थकहमी मिळवून दिली राजकीय विरोध आपल्या जागी, कारखाना आणि शेतकऱ्यांचे हित महत्वाचे – धनंजय मुंडे

मुंबई (दि. २३) —- : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या ३२ सहकारी साखर कारखान्यांना थक हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बीड जिल्ह्यातील परळी येथील माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास १० कोटी ७७ लाख रुपयांची थक हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही हमी मिळवून देण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आग्रही मागणी केली होती. एकीकडे एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे देणे थकीत असून दुसरीकडे ऐन विधानसभा निवडणूक काळात कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने कर्मचारी उपोषणाला बसले, त्यामुळे पंकजा मुंडे चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. यावर्षी परळी तालुका आणि परिसरात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर असून कारखाना सुरू होऊन सर्व उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या व अनेक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपण कारखाना या विषयात राजकारण आणणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेले आहे. दरम्यान मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वैद्यनाथ सह राज्यातील आणखी एकूण ३२ सहकारी साखर कारखान्यांना थक हमी देऊन त्या कारखान्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना यांना थक हमी मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केल्याची माहिती आहे. आतातरी शेतकऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे पैसे देऊन ‘वैद्यनाथ’ सांभाळा – धनंजय मुंडे स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी अथक प्रयत्नातून वैद्यनाथ कारखान्याला आशिया खंडात अग्रस्थानी नेऊन ठेवले होते. त्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांवर पगारासाठी उपोषणाची वेळ यावी, हे अत्यंत दुर्दैवी होते. राज्य सरकारने दिलेल्या थक हमीचा कारखाना प्रशासनाने योग्य वापर करून शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे हित जोपासावे, थकीत बिले आणि पगार करावेत असा सल्ला धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ कारखाना प्रशासनास दिला आहे. हजारो शेतकरी आणि शेकडो कर्मचारी ‘वैद्यनाथ’ कारखान्याचे लाभार्थी आहेत, त्यांचे हित लक्षात घेत आम्ही यात कधीही राजकारण आणले नाही, उलट कधीही मदत करण्याचीच भूमिका घेतली आहे. यावर्षी कारखाना गळीत हंगाम सुरू होऊन परिसरातील १००% उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. भविष्यात कधीही वैद्यनाथ कारखान्यासंबंधी कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास राज्य सरकारच्या माध्यमातून ती मदत करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

239 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *