FEATUREDLatestNewsमहाराष्ट्र

मुकेश अंबानींनी वॉरेन बफेट यांना टाकलं मागं; जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी

करोनाच्या महामारीने जगात थैमान घातलेलं असताना आणि त्यामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली असताना, मोठमोठ्या उद्योगधंद्यांवर यामुळे मोठा परिणाम झालेला असताना दुसरीकडे भारतातले मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांच्यासाठी मात्र २०२० हे वर्ष खूपच चांगलं ठरलं आहे. या काळात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये अनेक कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली. त्यांच्या रिलायन्स जीओच्या व्यवसायातही वाढ झाली आहे. त्याचमुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही या वर्षी जबरदस्त वाढ झाली आहे. त्यामुळे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ते सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी प्रसिद्ध उद्योगजक वॉरेन बफेट यांनाही मागे टाकलं आहे. ब्लूमबर्गने ही आकडेवारी जाहीर केली आहे. याबाबत फोर्ब्स इंडियाने वृत्त दिलं आहे.

७० अब्ज डॉलर झाली संपत्ती

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती सुमारे ७० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की आता मुकेश अंबानी यांचा जगातील १० सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत समावेश झाला असून त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती वॉरेन बफेट यांनाही मागे टाकलं आहे. बफेट यांची एकूण संपत्ती ६७.९ अब्ज डॉलर आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, गुरुवारी मुकेश अंबानी यांनी एकूण संपत्तीच्या बाबतीत वॉरेन बफेट यांनाही मागे टाकलं. मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ दिसून आली आहे.

लॉकडाउनमध्येही रिलायन्सचे शेअर्स झाले दुप्पट

या वर्षी मार्चपासून आत्तापर्यंत रिलायन्स इंडस्ट्रिजचे शेअर्स जवळपास दुप्पट झाले आहेत. रिलायन्सच्या डिजिटल उद्योगात १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक आल्याने त्यांच्या कंपनीमध्ये शेअरमध्ये वाढ झालेली दिसून आली. फेसबुक, सिल्वर लेक सारख्या कंपन्यांनी रिलायन्समध्ये १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. तर या आठवड्यात बीपी पीएलसी या कंपनीने १ अब्ज डॉलरची गुंतवणूक रिलायन्सच्या इंधन व्यवसायात केली आहे. त्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये जबरदस्त वाढ दिसून आली आहे.

वॉरेन बफेट, लॅरी पेज यांना टाकलं मागे

मुकेश अंबानी आशियाचे टायकून (शक्तीशाली भांडवलदार) बनले आहेत. तसेच जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील पहिल्या दहामध्ये त्यांचा समावेश झाला आहे. यामध्ये ते एकमेवर आशियाई उद्योजक आहेत. महत्वाची गोष्ट ही आहे की, वॉरेन बफेट यांनी या महिन्यांत २.९ अब्ज डॉलरचं दान केलं आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत घट झालेली पहायला मिळाली. मुकेश अंबानी यांनी सातव्या स्थानी झेप घेतली असून त्यांनी वॉरेन बफेट आणि गुगलचे लॅरी पेज यांना मागे टाकलं आहे.

केवळ २० दिवसांत वाढली ५ अब्ज डॉलरपेक्षाही जास्त संपत्ती

मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत गेल्या २० दिवसांत ५.४ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. २० जूनला मुकेश अंबानी फोर्ब्सच्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ९व्या स्थानी होते. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती ६४.५ अब्ज डॉलर इतकी होती. त्यानंतर त्यांच्या एकूण संपत्तीत गेल्या २० दिवसांध्ये ५.४ अब्ज डॉलरची वाढ झाली आणि त्यांची एकूण संपत्ती १२ लाख कोटींच्या जवळ पोहोचली. रिलायन्स इंडस्ट्रिज भारताची अशी एक कंपनी आहे, जिनं आपलं भांडवली मूल्य १२ लाख कोटी रुपये पार केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *