माध्यमांची मुस्कटदाबी, अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा..! – देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळांचे राज्यपालांना निवेदन

मुंबई : राज्यातील माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी थांबविण्यात यावी आणि राज्यपालांनी तसे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी विनंती करणारे निवेदन आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले.माजी मंत्री विनोद तावडे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशीष शेलार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या भेटीनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात एकप्रकारची अघोषित आणिबाणी लावल्याची स्थिती आहे. माध्यमांच्या संदर्भात मुस्कटदाबीचा प्रयत्न होतो आहे. प्रारंभी एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुळकर्णी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर टाईम्स नाऊच्या वरिष्ठ संपादकांना पत्र पाठवून एफआयआर करण्याची धमकी देण्यात आली. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गास्वामी यांना तर 12 तासाहून अधिक काळ चौकशीसाठी पोलिस स्थानकात बसवून ठेवण्यात आले. एकिकडे गुन्हेगारांना फिरण्यासाठी पासेस द्यायच्या आणि दुसरीकडे पत्रकारांची चौकशी करायची, असे हे दबावतंत्र आहे. राज्यात वृत्तपत्र वाटपाला सुद्धा परवानगी नाकारण्यात आली आहे आणि सोशल मिडियावर कुणी काही लिहिले तर पोलिस त्याला पकडून माफी मागायला लावत आहेत. भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिव्यक्तीचे जे स्वातंत्र्य आपल्या सर्वांना दिले, ते अबाधित रहावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *