माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसऱ्या फेरीला आष्टी तालुक्यात सुरुवात ; डॉ नितीन मोरे!
आष्टी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकार व आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहीमेच्या दुसऱ्या फेरीला आष्टी तालुक्यातील विविध गावात शनिवारी (ता.१७) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या निवासस्थानी तर रविवारी (ता.१८) आ.बाळासाहेब आजबे यांच्या निवासस्थानी भेट देऊन वैद्यकीय अधिकारी नितीन मोरे व त्यांच्या पथकातील आरोग्य कर्मचा-यांनी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्या उपस्थितीत कुटूंबियांची आरोग्य तपासणी केली. ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम शनिवारपासून दहा दिवस चालणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीताई या दरम्याच्या काळात स्वत: प्रत्येक घरोघरी जाऊन नागरीकांची आरोग्य तपासणी करणार आहेत. त्यामुळे कुटूंबातील सर्व सदस्यांनी घाबरुन न जाता आपल्या घरी येणा-या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचा-यांना सहकार्य करावे. कुठलाही आजार लपवून ठेवू नये. असे आवाहन गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी केले.
आष्टी तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गावागावातील सर्वसामान्य नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करून घ्यावी तसेच आरोग्य कर्मचा-यांना सहकार्य करावे. जेणेकरून आष्टी तालुक्यातुन कोरोनाला हद्दपार करण्यास मदत होईल.