माझे कुंटुंब माझी जबाबदारी यशस्वीपणे राबविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे = पालकंमत्री धनंजय मुंडे

बीड : राज्य शासन “माझे कुंटुंब माझी जबाबदारी” ही योजना राबवित असून जिल्हयात यशस्वीपणे राबवताना प्रत्येक कुंटुंबाचं सर्वेक्षण करुन त्या कुंटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे पथकामार्फत तपासणी करण्यात येईल. या कार्यक्रमामूळे जिल्हयात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीची ओळख होईल व त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना या आजारापासून टाळता येण्यास मदत होईल. ही योजना जिल्हयात यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 आढावा बैठक संपन्न झाली त्या प्रसंगी ते बोलत होते.

या बैठकीस आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री धनजंय मुंडे यांनी जिल्हयातील कोरोना विषयक प्रशासनाने करीत असलेल्या उपाय योजनांची संबंधिताकडून माहिती जाणून घेतली. यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री.मुंडे म्हणाले की, जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांना वेळेवर सर्व आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. गरजू बाधित रुग्णांना ऑक्सीजन ची व्यवस्था व बेडची सुविधा तात्काळ उपलब्ध करुन दिली पाहिजे. तसेच जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजन बेड, ऑक्सीजन पुरवठा, व्हेन्टीलेटरची सुविधा उपलब्ध असुन यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी वाढ करण्याची सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या आहेत.

कोरोनाच्या आजारापासून आपल्या कुंटुंबाचा बचाव करण्यासाठी माझे कुंटुंब माझी जबाबदारी या योजनेत सहभागी होवून 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करावे असेही पालकमंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हयात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7 हजार 538 आहे. जिल्हयात एकूण मयत रुग्णांची संख्या 211 असून त्यामध्ये जिल्हयात नोंद झालेले मयत रुग्ण 207 व इतर जिल्हयाच्या पोर्टलवर नोंद झालेल्या मयतांची रुग्णांची संख्या 4 आहे. जिल्हयाचा रिकव्हरी रेट 62.68 आहे. जिल्हयात दि. 14 व 15 सप्टेंबर 2020 या कालावधीत जवळपास 40 गावे व 4 शहरात 10 हजार 896 नागरिकांची ॲन्टीजेन टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये 404 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत अशी माहिती देण्यात आली.

यावेळी आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी योग्य त्या सुचना केल्या. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पीककर्ज वाटपाबाबत कडक भूमिका

दरम्यान वारंवार सूचना करूनही जिल्ह्यातील काही ठराविक बँका पीककर्ज वाटपाबाबत उदासीन असून शासकीय नियम धाब्यावर बसवून शेतकऱ्यांना किरकोळ कारणावरून वेठीस धरत आहेत, या सर्व बँकांमधील सरकारी खाते व डिपॉझिट काढून अन्य कारवाई करण्याबाबतची प्रक्रिया ना. मुंडे यांच्या निर्देशानुसार सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. यावेळी ज्या बँका उद्दिष्ट पूर्ती व कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या नवीन पीककर्ज संदर्भात टक्केवारी प्रमाणात कमी आहेत त्यांना रब्बी हंगामाचे उद्दिष्ट देण्यात येणार नाही असेही श्री. रेखावार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *