बीड जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरा – खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

परळी : बीड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अतिशय चांगले काम करीत आहे. मात्र सध्या जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्र आणि उप आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यामुळे कामावर असलेल्या कर्मचारी, अधिकारी वर्गावर मोठा ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन बीड जिल्ह्य़ातील आरोग्य विभागात रिक्त असलेल्या जागा त्वरीत भरती करून जिल्हावासियांना दिलासा द्यावा अशी मागणी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर एका पत्राव्दारे केली आहे.
खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी काही दिवसापूर्वी जिल्ह्यातील सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, वॉर्ड बॉय यांच्याशी व्हीडओ काँन्फरन्सव्दारे संवाद साधला. सध्याच्या कठिण परिस्थितीत अविरतपणे रुग्ण सेवा करून काम करत असल्याबाबत त्यांनी सर्वांचे कौतुक करून आभार व्यक्त केले. या बैठकीच्या दरम्यान त्यांनी जिल्ह्यातील पूर्ण आरोग्य विषयक बाबतीचा आढावा घेतला असता जिल्ह्यामध्ये आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बीड येथे पदे रिक्त असल्याचे लक्षात आले. मागील सरकारच्या काळात पंकजाताई मुंडे यांनी जि. प. आरोग्य विभाग बीड येथे वर्ग-1ची – 125, वर्ग-2ची -20, वर्ग-3 ची- 355 पदे मंजूर केली होती. त्यापैकी 248 पदेच भरली गेलेली आहेत व तेवढीच पदे अद्याप रिक्त आहेत. सर्व साधारण परिस्थितीत कर्मचार्‍यांची कमतरता होती पण आता बीड जिल्हा हा कोरोंनाच्या संकटात आहे, त्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांवर कामाचा प्रचंड ताण येत असल्याचे डॉ. प्रितमताई मुंडे यांनी निदर्शनास आणून दिले.
सध्या आरोग्य कर्मचारी रुग्णावर उपचार, स्वच्छता, सर्वेक्षण व जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन मध्ये प्रत्येक 100 घरामाघे एक आरोग्य टिम अशा विविध स्तरावर काम करत आहे. त्यामुळे कामावर असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर ताण येत आहे. बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाने सक्षमपणे काम करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरती करावीत आणि जिल्ह्याला दिलासा द्यावा अशी विनंती पत्राद्वारे खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व ग्राम विकास मंत्री यांचे कडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *