बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेने बीड जिल्हा परिषदेचा निधी परत द्यावा ; जि.प.गटनेते अजय मुंडे यांच्यासह जि.प. अध्यक्ष शिवाजी सिरसाट यांनी घेतली बॅकेच्या अध्यक्षाची भेट
बीड : बीड जिल्हा परिषदेच्या करोडो रुपयांचा निधी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे अडकला आहे. त्या ठेवी आता जिल्हा बँकेने परत जिल्हा परिषदेकडे वर्ग करावा, त्यातून जिल्हा परिषदेच्या अनेक विकासकामांना हक्काचा निधी प्राप्त होईल अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांच्याकडे शिष्टामंडळाने केली आहे.
यावेळी जि.प गटनेते अजय मुंडे यांच्या समवेत जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी सिरसाट यांच्यासह जि.प. सभापती जयसिंह सोळंके, समाजकल्याण सभापती कल्याण आबुज, सतीश आबा शिंदे, बाळासाहेब शेप, रामप्रभू सोळंके, लालासाहेब तिडके, गवते, बोरकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य व सरपंच विश्वांभर फड आदी उपस्थित होते.
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जिल्हा परिषदेचा जवळपास 174 कोटी रुपये निधी पडून आहे, जिल्हा बँकेच्या उदासीन कारभारामुळे हा निधी अडकून पडलेला आहे. ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या ताब्यात बीडची जिल्हा परिषद ताब्यात मिळवल्यानंतर ना. मुंडे यांच्या माध्यमातून अनेक विधायक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.
या विकासकामांना सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधीमुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत जिल्हा बँकेने त्यांच्याकडे अडकलेला निधी जिल्हा परिषदेला परत वर्ग करावा अशी मागणी रास्त असल्याची चर्चा होऊ लागली आहे.