FEATUREDLatestNewsमहाराष्ट्र

पेट्रोल पंपावर युवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

नागपूरः पैशाच्या वादातून गुंडाने साथीदाराच्या मदतीने अपहरण करून युवकाला पेट्रोल पंपावर जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही भयंकर घटना रविवारी शांतीनगर भागात उघडकीस आली. या घटनेत युवक थोडक्यात बचावला. शांतीनगर पोलिसांनी अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून कुख्यात गुंडासह दोघांना अटक केली आहे. सागर यादव (वय २५) व त्याचा साथीदार रजत राऊत, अशी अटकेतील अपहरणकर्त्यांची नावे आहेत. सागर याच्याविरुद्ध तडीपार व एमपीडीअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. किराणा व्यापारी भावेश भागवानी (वय २० रा. तुलसीनगर) , या युवकाला पोलिसांनी वाचवले.भावेश याचा मित्र मोहित देवानी याने सागर याच्याकडून पैसे उधार घेतले. मात्र मोहित सागर याला पैसे परत करीत नव्हता. त्यामुळे सागर हा संतापला होता. रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भावेश भागवानी (वय २० रा. तुलसीनगर) हा त्याचा मित्र त्रिलोक तोलानी (वय २५) याच्यासोबत छाप्रूनगर येथे क्रिकेट खेळायला जात होता. याचदरम्यान गुंड सागर यादव (वय २५) व त्याचा साथीदार रजत राऊत या दोघांनी भावेश याला अडविले. बळजबरीने त्याला मोटरसायवर बसविले. दोघांनी भावेश याला त्याचा मित्र मोहित याच्या मोबाइलवर संपर्क साधण्यासाठी धमकावले. त्याने नकार दिला. दोघांनी भावेश याला मारहाण केली. भावेश याने मोहित याच्या मोबाइलवर संपर्क साधला. यावेळी मोहित हा कन्हान येथे होता. मोहित येईपर्यंत आमच्यासोबत राहण्याचा दम दोघांनी भावेश याला दिला. त्यानंतर दोघेही भावेश याला शांतीनगरमधील पेट्रोल पंपावर घेऊन गेले. तेथे भावेश याला पुन्हा मारहाण केली. पंपावरील पाइपमधून सागर याने भावेश याच्या अंगावर पेट्रोल टाकले. जीवंत जाळण्याची धमकी दिली. दरम्यान, सागर व त्याच्या साथीदारांनी भावेशचे अपहरण केल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. भावेशच्या मित्राने सागरशी संपर्क साधला. त्यानंतर सागर याने भावेशची मुक्तता केली. भावेश याने शांतीनगर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सागर व त्याच्या साथीदाराला अटक केली. पोलिसांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *