पहिल्याच पाण्यात महापूर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
आमठाणा (प्रतिनिधी) – सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव, गोळेगाव, पानवडोद, धोत्रा, आदी भागात अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.बळीराजाने शेतीमध्ये ठिबक सिंचन अंथरून मिरची व कपाशी पिकाची लागवड केली होती व काहींनी पिकांना लागणाऱ्या रासायनिक खतांचा साठा करून ठेवला होता मात्र गुरुवार दिनांक 12 रोजी रात्री 11 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने शेतातील ठिबक सिंचन,मिरची साठी वापरलेला मल्चिंग पेपर,पाण्यात वाहून गेल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.जुई नदीच्या काठावर असलेल्या उंडणगाव,गोळेगाव, पानवडोद,धोत्रा या गावात नदी ओव्हरफ्लो झाल्याने नदीत येणारे व पावसाचे पाणी गावात शिरून काहींच्या घरात शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व काहींच्या घरावरी पत्रे उडाल्यामुळे मोठी कसरत करून स्वतःचा जीव वाचवावा लागला.
पानवडोद येथे पानवडोद बु व पानवडोद खुर्द या दोन्ही गावांना जोडणारा जुई नदीवर असलेला पूल तुटल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे व या पुलाजवळ असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे काही वर्षांपासून या पुलाचे नवीन बांधकाम करून रोड लेव्हल पूल बांधण्याची मागणी केली आहे मात्र प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नसल्यामुळे या पुलाजवळ रहाणाऱ्या नागरिकांना मोठया संकटांना सामोरे जावे लागत आहे ,याच नदीचे मागे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते मात्र पूर जास्त प्रमाणात असल्यामुळे या नदीच्या कडेला असलेल्या शेताची माती वाहून गेल्याने नदी जास्त प्रमाणात रुंद झाली आहे तसेच गावाजवळ असलेले तलाव पहिल्याच पाण्यात भरले आहे.वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने काहींच्या घरात पाणी घुसल्याने घराच्या भिंती कोसळल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.