परळी तालुक्यात साडेतीन लाखांची ५७ पोते गावठी तंबाखू जप्त

उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या पथकाची कामगिरी

परळी : गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या विशेष पथकाने परळी तालुक्यातील टोकवाडी येथे छापा मारून गावठी तंबाखूचे तब्बल ५७ पोते जप्त केले. या तंबाखूची एकूण किंमत ३ लाख ४२ हजार एवढी आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात येवून संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच, तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही बेकायदेशीर रित्या विक्री करण्याच्या उद्देशाने परळी तालुक्यातील टोकवाडी येथील एका घरात तंबाखूचा मोठा साठा करण्यात आल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना मिळाली होती. सदर माहितीची खातरजमा झाल्यानंतर धस यांच्या विशेष पथकाने रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास टोकवाडीतील कलाकेंद्राच्या पाठीमागे असलेल्या विठ्ठल पवार यांच्या घरावर छापा मारला. घराची झडती घेतली असता पवार यांचा भाडेकरू सय्यद जाबेर सय्यद इब्राहीम याने त्याच्या खोलीत साठा करून ठेवलेली ३ लाख ४२ हजार रूपयांची ५७ पोते तंबाखू आढळून आली. दोन दिवसापूर्वीच जाबेरने हा साठा तिथे आणून ठेवला होता. पोलिसांनी सर्व तंबाखू जप्त करून त्याचा नमुना परिक्षणासाठी अन्न व भेसळ विभागाकडे पाठवून दिला आहे. याप्रकरणी सहा. फौजदार कल्याण सावंत यांच्या फिर्यादीवरून सय्यद जाबेर सय्यद इब्राहीम याच्यावर परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यांनी घेतला कारवाईत सहभाग
ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार कल्याण सावंत, हे.काॅ. शेख शफीक, पो.ना. अंबेकर, पो.काॅ. खेलगुडे आणि चालक सपकाळ यांनी पार पाडली. नजीकच्या काळात तंबाखूचा एवढा मोठा साठा सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने धस यांच्या पथकाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *