परळी तालुक्यात गुरांना गुढ आजाराची लागण ; ताप, अंगावर गाठी व गळ्याला सुज लक्षणांमुळे वाढली धास्ती

परळी : तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या दोन दिवसापासून गाई-बैल या गुरांमध्ये नेहमीपेक्षा वेगळा व गुढ असा आजार झाल्याचे आढळून येत आहे. गुरांना गुढ आजाराची लागण झाल्याने पशुपालक धास्तावले आहेत. यामध्ये जनावरांच्या अंगात ताप, अंगावर गाठी व गळ्याला सूज असून चारापाणी न घेणे ही लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिक घाबरून जात आहेत परंतु पशुवैद्यकीय टीम यावर लक्ष ठेवून उपचार करत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन  प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.     गेल्या दोन दिवसापासून परळी तालुक्यातील काही गावातील गुरे ही चारा खात नसल्याचे पशुपालकांच्या निदर्शनास आले. या संख्येमध्ये सारखी भर पडल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे गुरांमध्ये आढळून येत असलेला हा आजार संसर्गजन्य आजार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.  पशु वैद्यकीय तपासणीसाठी ही जनावरे नेली असता हे व्हायरल इन्फेक्शन असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले.या गुरांवर उपचार करण्यात आले आहेत तसेच या आजाराने बाधित असलेल्या गुरांचे नमुने पशुवैद्यकीय विद्यापीठाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रथम दर्शनी या गुरांमध्ये आपल्याकडे नेहमी न आढळणारा आजार असल्याचे लक्षात येत असून आजाराला लींपीस्किन व्हायरल इन्फेक्शन असे म्हणतात असे वैद्यकीय सुत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथे अशा प्रकारच्या आजाराची लागण झाल्याची  20 ते 25 गुरे  आढळून आली आहेत. या ठिकाणी पशुवैद्यकीय पथक या गुरांवर उपचार करत आहे. पशुवैद्यकीय विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुरांवर पशुवैद्यकीय उपचार तातडीने सुरू करण्यात आले असून अशाप्रकारची लागण असलेली गुरे आढळल्यास  इतर गुरांपासून बाधित गुरांना दूर ठेवावे. तसेच हा ज्वर आजार असून यामध्ये घाबरून जाण्यासारखे काही नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. वैद्यकीय उपचार तातडीने व तत्परतेने करण्यास प्रशासन सज्ज असल्याचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पी.एल. आघाव यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *