परतूर तालुक्यातील दगावलेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह
परतूर/शेख अथर
मुंबई येथून 19 मे रोजी परतूर तालुक्यातील मापेगाव येथे आलेल्या कोरोना संशयित रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला होता. त्याच दगावलेल्या रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद जाहेद यांनी दिली आहे.
याबाबत त्यांनी सांगितले की, सदरील मयत व्यक्ती (दि. 19 मे) रोजी तालुक्यातील मापेगाव बु. येथे कुटुंबासोबत आला होता. त्यांना स्थानिक ग्रामपंचायत मार्फत सरपंच व इतर स्वयंसेवक यांनी जिल्हा परिषद शाळेत विलगिकरण केले होते. मात्र त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने (दि. 29 मे) रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाचे लाळेचे नमुन घेऊन प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते. मात्र अहवाल येण्या अगोदरच मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना निधन झाले. अहवाल काय येतो याकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून होते. त्यानंतर (दि. 31 मे) रोजी सकाळी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची पुष्टीही उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिली आहे.