LatestNewsमहाराष्ट्र

न्यूजपेपर आला रे… घरोघरी वर्तमानपत्र वितरण सुरु, पेपर हातात आल्याचा नागरिकांना आनंद..!!

मुंबई : मुंबईत आजपासून वृत्तपेपर विक्रेत्यांना घरोघरी पेपर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार आज मुंबईत घरोघरी जाऊन पेपर देण्यास पेपर टाकणाऱ्या मुलांनी सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे मागील अडीच महिन्यांपासून हातात घेऊन पेपर वाचता न येणाऱ्यांसाठी आजचा दिवस आनंद देणारा ठरला आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरोघरी जाऊन पेपर टाकण्यास बंदी घातली होती. त्यामुळे मागील जवळपास 75 दिवस नागरिकांना हातात पेपर घेऊन वाचण्याचा आनंद मिळाला नव्हता.

परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करत असतानाचं मुंबईसह महाराष्ट्र पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियमांमध्ये शिथिलता आणण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार आतापर्यंत सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्याचा अटीवर इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, कपड्याची दुकाने, सोन्याचांदीची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच स्टॉलवर पेपर विकण्यास पेपर विक्रेत्यांना परवानगी दिली होती. यासोबतच आजपासून घरोघरी जाऊन पेपर देण्यास देखील परवानगी दिली आहे.

याबाबत बोलताना, पेपर देण्यासाठी घरोघरी जाणारा स्वप्नील खांडेकर म्हणाला की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून पेपर घरोघरी देण्यासाठी परवानगी देणारा निर्णय हा आमच्यासाठी खूप दिलासा देणारा आहे. मागील जवळपास अडीच महिन्यांपासून पेपरची लाईन बंद असल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली होती. मुळात या व्यवसायातून खुप जास्त प्रमाणात फायदा होतं नाही. त्यातच वृत्तपत्रांमुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते या गैरसमजामुळे नागरिकांनी पेपर घेण्यास नकार दिला. मुंबईतील अनेक सोसायट्यांनी आम्हांला सोसायटीमध्ये येण्यास बंदी घातली. परंतु नंतरच्या काळात पेपरमुळे कोरोना व्हायरची लागण होतं नाही हे सिद्ध झालं.

परंतु नागरिकांच्या मनातील भीती गेली नव्हती. आज असं देखील चित्र थोड्याफार प्रमाणात पाहिला मिळालं. काही सोसायट्यांनी आम्हाला सोसायट्यांमध्ये येण्यास नकार दिला. परंतु ज्यांना पेपर हवा आहे. त्यांनी सोसायटीच्या गेटवर पेपर देण्यास परवानगी दिली आहे. आता नागरिकांमध्ये कोरोना बाबत जनजागृती होतं आहे. त्यामुळे लवकरच घराघरांमध्ये पेपर पोहोचवले जातील यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *