निवृत्तीनिमित्त कृतत्ज्ञतास्पद मनोगत अजीज लहानकर …!!
नांदेड/शेख इस्माईल : कोणत्याही लोकसेवकाच्या मनात निवृत्ती जवळ आली की अस्वस्थता निर्माण होते. कारण हल्ली सामाजिक संबंध व सौहार्द विसविशीत झालेल्या युगात निवृत्तीप्रान्त जीवन एक कठीण काळ ठरतो आहे. मी पण नियत वयोमानानुसार दि.31/05/2020 रोजी शासन सेवेतून मुक्त होत आहे. राज्य सरकारचे सर्वात मोठे प्रतिपाळ व सधन खाते म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाची गणना केली जाते. सुदैवाने मीही या विभागाचा घटक राहिलो.परंतु या विभागातील बहुतांश लोकसेवक त्यांच्या पदानुरूप कर्तव्यात करीत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, चुकीचे नियोजन, अनियंत्रित अधिनस्तवर्ग ,तांत्रिक अपरिपक्वता, पदाचा फाजिल अहंकार, पसंतीस्थळी बदलीसाठीची सर्वोपरी धडपड ,आपसी असमन्वयता,सवंग प्रसिद्धीचे वेड तथा विलासी जीवनशैलीची महत्वाकांक्षी स्पर्धा यामुळे या विभागाची प्रतिमा जनमानसात मलिन होत आहे. म्हणूनच 15 सप्टेंबरला शुभेच्छा देणा-या अतिउत्साही अभियंत्याना त्यांचे त्यांनाच मनोमन हसू येत असेल. कारण सा.बां नियमावलीतील परि. 125,141, 228,249,255 किंवा परिशिष्ट 24 तसेच बी1 निविदेतील 2,3,6,9,10,23,17 इ. नित्यनिगडित खंडाच्या ज्ञानाअभावी कोणी क्षेत्रीय अधिकारी आपल्या दायित्वाशी कसे न्याय करू शकेल. शिवाय काटकसरी व बळकटी हे धोरण दुर्लक्षित करून खुशमस्करी वृत्तीने कार्य करणा-यास अमाप पैसा अन् प्रसिद्धी मिळत असेल तर प्रशासनातील सचोटी या शब्दाला चिटकून दबंगाईने नोकरी करणे म्हणजे स्वतःला वाळीत टाकून घेतल्यासारखे होईल . अन् वारंवारितेने ही एकच चूक माझ्याकडून होत राहिल्याने दुदैर्वाने प्रसिद्धीपूर्व (कु) माझ्याशी जोडला गेला. परिणामी नोकरी ही शाप की वरदान या विवंचनेतच मी निवृत्तीला पोहचलो. ह्यात कु-हाडीचा दांडा गोतास काळ प्रमाणे मुख्य भूमिका माझ्या सहका-यांचीच राहिली हे निर्विवाद सत्य मी नेहमीच व्यक्त करीत आलो. आपापसातील स्पर्धेतून कार्यालयीन गोपनीयता भंग करत दिलेलं वरदान हे आपणांसच घातक ठरू शकते ह्याची कल्पनाही मी मित्रत्वात देत आलो; त्यातच असामाजिक तत्वाकडून अधिका-यांवर वारंवार होणारे हल्ले आपल्याच चुकाचे फलित असल्याचेही निक्षून सांगत आलो ; मा.लोकप्रतिनिधींच्या सूचनांचे पालन करत त्यांच्या थेट आशीर्वादाशिवाय सुद्धा नोकरी करणं अगदी सोपं आहे हे पण पटवून देत गेलो ; वरिष्ठांची मर्जी राखत सेवा करण्यापेक्षा डेकोरम पाळत केलेल्या सेवेत वेगळाच आनंद असतो हे ही सांगत आलो ; पण माझ्या सहका-यांनी मलाच चुकीचे ठरवत अपरोक्षात माझी चेष्टाच केली .असे असले तरी माझ्या निर्भिड व पारदर्शक कार्यप्रणालीचे उघड समर्थन स्थानिकांसह समस्त पत्रकार मित्रांनी ( कधीच जाहिरात अपेक्षित न करता ) केल्यानेच एका डांबरचोरी प्रकरणात 03/2004 मध्ये तथाकथित दबंग ठेकेदारावर, 12/2011 मध्ये बोगस देयक दिल्याबाबत खात्यांतर्गत अधिका-यांवर , निवृत्त होऊनही वर्षभर विश्रामगृहाचा ताबा न सोडणा-या प्रस्थापित चौकिदारावर
09/2014 मध्ये एका दिवसात पळवून लावण्याची तसेच 07/2016 मध्ये अनधिकृतपणे विश्रामगृहात प्रवेश करणा-या एका पोलिस अधिका-यावर रितसर कारवाई करू शकलो. अशा प्रकारच्या प्रत्येक शासनहितार्थ कार्यवाहीत मग ती अतिक्रमण हटाव मोहीम असो की, अधिनस्तास शिस्त लावण्याचा प्रसंग असो की , रस्त्यालगतची झाडे तोडण्याचा गैरप्रकार असो की , विश्रामगृहात अनधिकृत प्रवेश निषिध्द करणे असो की , सिमेंट रस्त्याला राफ्टर लावणे असो की, कामांच्या गुणावहतेशी निगडित बाब असो ; सबंध प्रकरणात जे जे अधिकारी माझ्यामागे राहिले त्यांचे मनस्वी आभार. त्यात प्रामुख्याने सर्वश्री सुनिल वाढेकर (मुअ), सी.व्ही.तुंगे (निमुअ) संतोष शेलार ,आर आर.हांडे (अअ) फाजेल अली काद्री, दिगांबर कोळेकर, आर.एन. पटवेकर (निकाअ) तसेच सुरेश शिराढोणकर, मोहन वडजकर, विश्वंभर सिंगनवाड ,मुश्ताक अहमद, जब्बार काद्री (निउपअ) डी.बी.निळकंठ, ओमप्रकाश बेंबरे (उपअ) सह मनपा.नांदेड प्रतिनियुक्ती कालावधीतील तत्कालीन आयुक्त किरण कुरुंदकर यांचा समावेश आहे. शिवाय नफा ना तोटा धर्तीवर सेवेच्या अंतिम चरणात (29 महिने) अगदी निकामी (idle)ठेवून वेतन दिल्याबद्दल उपअभि, काअ, अअ व मुअ.(सर्व विद्यमान) यांचेही आभार. इमारती कामांची आवड व अनुभव असल्याने सर्वच उपभोक्ता कार्यालय प्रमुखांशी माझे अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध राहिलेत, त्यांचा नामोल्लेख न करता त्या सर्वच मान्यवरांचे आभार . सा.बां.विभागातील एकंदर सर्वच अतांत्रिक कर्मचा-यांनी ( आस्था.क्लर्क,आडिटर इ.) मला मोलाची साथ दिली; मी सादर केलेले विविध प्रस्ताव किंवा देयके विनात्रुटी तत्पर फारवर्ड केले; माझ्या कार्यालयीन पत्रव्यवहार तथा लेखनशैलीस दाद दिली, त्या सर्वांप्रती कृतत्ज्ञता व्यक्त करतो. ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली तेथील सर्वच पत्रकार तथा प्रतिष्ठितांनी खूप प्रेम दिलंय त्या सर्वांचे सह्रदय आभार. सा.बां. विभागातील कटु/ गोड अनुभव लिखित स्वरूपात कथन करण्याचा यथावकाश मानस आहे , जे नवीन अधिकारी पिढीसाठी सकारात्मक ठरू शकेल. तुर्तास पाॅज घेतो आणि प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे स्पष्ट करू इच्छितो की, शासन सेवेतून निवृत्त होण्याची मला मूळीच खंत नाही. कारण ज्याची एण्ट्री वाघासारखी राहिली त्याची एक्सीट उंदरासारखी होणे हे माझ्या कुटुंबियासही स्वीकारार्ह नव्हते. खरेतर माझ्या तात्विक कार्यपध्दतीचा मानसिक त्रास त्यांनाही झाला. तरीपण माझी तिन्ही मुलं आणि तिघा भावांनी ध्यैर्याने व स्थैर्याने मला दिलेल्या सहकार्याचे कौतुक न केल्यास माझे अलविदारूपी मनोगत निष्प्रभ ठरेल . थॅन्क्स टू ऑल ; गुड बाय PWD & PWD,ans ! (अजीज लहानकर, शा.अ. सा.बां. विभाग, भोकर )