ना पाहुण्यांची गर्दी….ना जेवणाच्या पंगती; आदर्श विवाह सोहळा
परतूर (प्रतिनिधी) – ना पाहुण्यांची गर्दी …ना जेवणाच्या पंगती…कुठलाही थाटमाट नाही…वाजंत्री नाही की फटाक्याचा आवाज नाही…सारे कसे शांत….शांत हे वर्णन आहे परतुर तालुक्यातील रोहिना या छोट्याशा गावात अतिशय साध्या पद्धतीने पार पाडलेल्या विवाह सोहळ्याचे ! सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांच्या पुढाकारतून शुक्रवारी दुपारी हा आदर्श विवाह पार पडला. शहरातील आंबेडकरनगरमधील रहिवाशी लक्ष्मण पाडेवार यांचे चिरंजीव संतोष यांचा विवाह रोहिना येथील भगवान प्रधान यांची मुलगी लक्ष्मी हिच्याशी निश्चित झाला होता.शुक्रवारी लग्नाची तारीख काढण्यासाठी पाहुणे मंडळी एकत्र जमली होती.त्यात पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन हे देखील होते. याच वेळी लग्नाची पुढील तारीख ठरवून लग्न थाटामाटात न करता आजच साध्या पद्धतीने लग्न लावले तर अनाठायी खर्चाला आळा बसेल,कोरोनाच्या गर्दी करू नये या नियमचे पालन होईल आणि एक चांगला संदेश समाजात जाईल असा विचार बैठकीतील पाहुण्यांसमोर मांडला.पाडेवार यांचा हा विचार सर्वांनाच आवडला.लगेच लग्न लावण्यावर सर्वांचे एकमत झाले.नवरदेव आणि नवरीला हा निर्णय सांगण्यात आला.त्यांनीही फारसे आढेवेढे न घेता संमती दिली.कपडे आणि ईतर आवश्यक सामान ताबडतोब मागविण्यात आले.हुंडा, सोने-नाणे ईतर कुठलीही अपेक्षा यावेळी करण्यात आली नाही हे विशेष ! काही तासातच केवळ 25 जणांच्या उपस्थितीत हा आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.सरपंच राहुल काळे,पोलिस पाटील शामराव कांबळे यांच्यासह गावातील काही मोजकी मंडळी यावेळी उपस्थित होती. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यातच बाजारपेठ सुरू झाली आहे.प्रत्येकाने गर्दीपासून दूर राहणे गरजेचे आहे.खबरदारी हीच आता सर्वांची जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन गर्दी टाळत साध्या पद्धतीने लग्न लावण्याचे मत मांडले आणि सर्वांनी त्याचा स्वीकार केला.अगदी कुठलाही बडेजाव न करता अत्यंत साध्या पद्धतीने हा आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला. अर्जुन पाडेवार,सामाजिक कार्यकर्ते,परतूर.