‘धनु भाऊ, आता तुम्हीच आमचे माय बाप आहात, आम्हाला न्याय द्या…! ‘

बीड : बीड जिल्ह्यातील मांगवडगाव तिहेरी हत्याकांडातील पीडित पवार कुटुंबियांची आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन पवार कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे यासाठी आपण प्रयत्न करणार असून विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केली जाईल असे श्री. मुंडे म्हणाले. तसेच सदर प्रकरणातील दोषारोपपत्र ५० दिवसांच्या आत दाखल करावे अशा सूचना ना. मुंडेंनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी ना. मुंडे यांच्यासह आमदार संजय दौड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, बहुजन मुक्ती मोर्चाचे बाबुराव पोटभरे, मानवी हक्क अभियानचे मिलिंद आव्हाड, अजय मुंडे , शिवाजी शिरसाट, दत्ताआबा पाटील यांसह अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांसह स्थानिक अधिकारी उपस्थित होते.

धनंजय मुंडे पवार कुटुंबाच्या पालावर जाताच पवार कुटुंबियांनी ‘धनु भाऊ, आता तुम्हीच आमचे माय बाप आहात, आम्हाला न्याय द्या…’ असे म्हणत टाहो फोडला.

यावेळी ना. मुंडे यांनी या प्रकरणातील दोषींना शिक्षा मिळून 100 % न्याय मिळेल अशी खात्री दिली.

अंबेजोगाई येथे पालावर राहणाऱ्या पवार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी ना. मुंडे यांनी किमान तीन महिने पुरेल इतके अन्न धान्य पवार कुटुंबियांना देण्याबाबत स्थानिक तहसीलदारांना आदेशित केले आहे. तसेच विभागामार्फत घरकुल योजनेतून घरासाठी निधी व जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे ना. मुंडे म्हणाले.

दरम्यान सामाजिक न्याय विभागामार्फत हत्या झालेल्या तीनही व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख १२ हजार रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात आली आहे. तसेच योजनेनुसार उर्वरित ४ लाख १२ हजार रुपये रक्कम दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर देण्यात येईल असे ना. मुंडे म्हणाले.

पवार कुटुंबीयांनी ना. मुंडे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या, यावेळी हे प्रकरण जमिनीच्या वादातून झाले असल्याचा संशय असल्याने पवार कुटुंबाने आपल्याला आणखी धोका होऊ नये म्हणून इतरत्र जमीन मिळवून देण्याबाबत ना. मुंडे यांना विनंती केली. श्री. मुंडे यांनी पवार कुटुंबियांना इतरत्र जमीन मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *