दे दान सुटे गि-याण
दे दान सुटे गिर्याण!
‐————————
नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या ग्रहण हे सुर्य आणि चंद्राला लागत असते, जसे सुर्य आणि चंद्र यांना ग्रहण लागते, त्याच प्रमाणे हे ग्रहण एखाद्या व्यक्तीला, समाजव्यवस्थेला, गावाला, शहराला, जिह्याला, राज्याला अथवा देशालाही लागते हे आपल्या मागचे ग्रहण सुटावे यातुन मुक्तता व्हावी यासाठी रूढी परंपरेने चालत आलेली एक रित आहे. ती म्हणजे ” दे दान सुट गिर्याण”. म्हणजे आपल्याला लागलेल्या ग्रहणातुन सुटका करून घेण्यासाठी दाण केल्याने ग्रहण सुटते अशी सर्वसाधारण धारणा आहे. परंतु आजच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय व्यवस्थेत दान देणार्यांपेक्षा मागणार्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दान धर्म करणार्यांचा भारतीय?इतिहास फार दैदिप्यमान आहे. या भारतीय संस्कृतीची ओळखच दानशुरांची आहे. प्राचीन काळात दानशुर म्हणुन ओळख असलेल्या बळीराजाने स्वप्नात दिलेले दान प्रत्यक्षात जागृतीमध्येही दिले. परंतु दान देणार्यालाच वामनाने त्याच्या मस्तकावर पाय देऊन पाताळात घातले. हा पण वेगळा चिंतनाचा विषय आहे. दुसरा दानशुर म्हणुन कर्ण हा महान दानवीर होऊन गेला. कुरूक्षेत्रावर शेवटची घटका जवळ आलेली असतांना भगवान श्रीकृष्णाने अश्या प्रसंगी सुध्दा कर्णाची अग्नी परिक्षा घेत दान मागितले. धारातिर्थी पडलेल्या अवस्थेत, देण्याची परिस्थिती नसतांनाही आपला सोन्याचा दात काढुन कर्णाने श्रीकृष्णाच्या हातात ठेवला. असेच एक दानशुर दाम्पत्य पुर्वी आपल्या परळी नगरीत म्हणजेच पुर्वीच्या प्रभाकरक्षेत्री होऊन गेल्याची कथा आहे. ते होते राजा श्रीयाळ आणि माता चांगुणा यांची परिक्षा स्वत: भगवान शंकरांनी घेतली. आपल्या पोटच्या एकुलत्या एक मुलाच्या मासाचे अन्न शिजवुन इच्छा भोजनाचे व्रत पुर्ण केले. नंतर भोळ्या शंकराने त्यांचा चिल्लीया नावाचा मुलगा जिवंत करून परत दिला. अशी शेकडो नाही तर हजारो उदाहरणे देता येतील. हा भारतीय दानविरांचा विषय झाला.
आजच्या आधुनिक काळात किंवा कलयुगात हा इतिहास पुर्णपणे विरूध्द दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आजच्या स्वातंत्र्योत्तर काळात भारत हा दारिद्रय रेषेखालचा देश होत चालला आहे. सध्याच्या राजकीय व्यवस्थेने या देशाला दानशुरतेकडुन “दीन”तेकडे प्रवास सुरू केला आहे. सध्या प्रत्येक भारतीय मागणी किंवा याचना करतांनाच पहावयास मिळत आहे. ही मागण्याची सुरूवात आपल्या घरापासुनच सुरू होत आहे. मुलं आपल्या आई-वडिलांकडे सारखी मागणी करत असतात, पत्नी-पतीकडे, आई-वडीलांकडे मागणारी मुले मोठी झाली आणि आई-वडील वृध्द झाले की, त्याच आई-वडीलांना मुले असुन सुध्दा शासन दप्तरी निराधाराचे अनुदान मागण्यासाठी खेटे मारावे लागतात. एवढेच नाहीतर शिक्षक विद्यार्थ्यांकडुन, विद्यार्थी शिक्षकांकडुन, नौकरदार शासनाकडुन, शासन जनतेकडुन, मतदार नेत्यांकडुन, नेता मतदारांकडुन काहीना काही मागत राहतो. एवढेच नाही तर मंदिरात दर्शनासाठी जातांना मंदिराबाहेर भिक्षूक मागतो तर आत दर्शनासाठी गेलेला तो व्यक्ती सुध्दा देवाकडे मागणीच करतो. सगळेच कसे मागतकरी असल्यासारखेच वागत आहेत. ज्याच्याकडे सर्व धनसंपदा-एैश्वर्य आहे तो समाधान मागत आहे. शेवटी मागणे कायम…
हे झाले मागणारे आपण दानशुर पाहिले आणि मागणारेही पाहिले आता ग्रहण बघु अगोदर सांगितल्याप्रमाणे सुर्य आणि चंद्र या ग्रहाचे ग्रहण पाहिले तसेच आपल्या व्यवस्थेत सामाजिक, धार्मिक व्यवस्थेला कसे ग्रहण लागले हे पाहिले पाहिजे. अगदी गावपातळीवर पाहिलेतर सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांच्या रूपानेच गावाला ग्रहण लागल्याचे लक्षात येत आहे. एकुणच काय तर सामाजिक, धार्मिक व्यवस्थेला नव्याने निर्माण?झालेल्या आधुनिक राजकीय व्यवस्थेमुळे ग्रहण लागल्याचे दिसून येईल. या ग्रहणाचा अर्थ विकासाच्या पायाभुत सुविधांचा विस्कळीत झालेला आलेख, वाढती बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, महिलांचे खच्चीकरण, आर्थिक विषमतेची वाढत चाललेली दरी, जातीयवादाचे फोफावत चाललेले पिक, धर्मवादाचा अतिरेक आणि त्याला खतपाणी घालणारी राजकीय व्यवस्था. स्वत:च्या स्वार्थासाठी ही व्यवस्था हातात असलेले पिढ्यान पिढ्याचे राजकारणी हे या ग्रहणास कारणीभुत आहेत. या ग्रहणातुन सुटकेसाठी फार मोठी वैचारिक क्रांती होणे अपेक्षीत आहे. परंतु हे होण्याचे स्वप्न अस्तित्वात येण्याच्या मार्गातील अडथळा सुध्दा ग्रहणाला कारणीभुत असलेले लोकच आहेत. हे समजुन आणि उमजुन घेण्याची गरज सर्वच सामाजिक घटकांना आहे.
-:लेखक :-
गोपाळ रावसाहेब आंधळे
कार्यकारी संपादक
दैनिक जगमिञ
परळी वैद्यनाथ
मो:-9823335439