देवीच्या भक्तांनी आषाढ उत्सव घरच्या घरीच साजरा करावा – सचिन भांडे
परळी वै., (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या संकटामुळे देवीच्या भक्तांनी या वर्षीचा आषाढी उत्सव घरच्या घरीच साजरा करावा, असे आवाहन पत्रकार सचिन भांडे यांनी केले आहे. परळी शहरासह महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र प्रदेश,गोवा आदी ठिकाणी प्रत्येक वर्षी गोंधळी समाजासह इतरही काही भटक्या विमुक्त समाजात आषाढ महिन्यात देवीची उपासना व पूजा करण्यात येते, या वर्षी भारतात कोरोना संसर्गाचा धोका असल्याने, समाज बांधवांनी काळजी घ्यावी तसेच स्वतःसह इतरांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी देवीची पालखी,मिरवणूक,सार्वजनिक पूजा टाळावी व कोणीही घराबाहेर पडू नये. देशातील कोरोनाचे महासंकट दूर करण्यासाठी प्रत्येकाने घरातूनच आषाढ साजरा करून हे संकट दूर व्हावे यासाठी देवीला साकडं घालावे. आषाढ महिन्यात अनेक ठिकाणी बोकड व पशु बळी देण्याची प्रथा आहे या प्रथेला फाटा देत भक्तांनी देवीला पुराण पोळी किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.असे आवाहनही सचिन भांडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.