LatestNewsबीड जिल्हा

दहावीच्या परीक्षेत बीड जिल्हा विभागात चौथ्या स्थानी ; 91.24 टक्के निकाल !!

बीड : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज बुधवारी (दि.29) बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला आहे. यंदा बीड जिल्ह्याचा दहावीचा निकालाचा टक्का घसरला आहे. औरंगाबाद विभागात सलग चार वेळेस प्रथमस्थानी असणार्‍या बीड जिल्ह्याचा निकाल यंदा चौथ्या स्थानावर गेला आहे. जिल्ह्याचा एकुण निकाल 91.24 टक्के इतका लागला आहे. यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी (94.36) अधिक आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 88.94 टक्के इतके आहे.

दहावीचा निकाल कधी लागतो याची सर्वच विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. यंदा कोरोनाचे संकट कायम असल्याने निकाल लागण्यास उशीर होईल असे सांगण्यात येत होते. त्यामुळे साधारण जून महिन्यात जाहीर होणारा दहावीचा निकाल यंदा थेट जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आज बुधवारी लागला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात बीड जिल्ह्याचा 91.24 टक्के इतका लागला आहे. मार्च मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 645 शाळांमधील 24 हजार 798 मुले व 18 हजार 307 मुली अशा एकुण 43 हजार 105 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. पैकी 24 हजार 612 मुले व 18 हजार 176 मुली अशा एकुण 42 हजार 788 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. आज हाती आलेल्या निकालावरुन यापैकी 21 हजार 890 मुले 17 हजार 150 मुली असे एकुण 39 हजार 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेेत. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णचे प्रमाण अधिक आहे. हे निकालावरुन स्पष्ट झाले आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 93.85 टक्के निकाल परळी तालुक्याचा लागला असून त्या खालोखाल आष्टी तालुक्याने 93. 38 टक्के निकाल घेत जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला आहेत तर अंबाजोगाई तालुका 93.3 टक्के निकाल घेत जिल्ह्यात तृतीयस्थानी राहिला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून अभिनंदन केले जात आहे.

तालुका निहाय निकाल :

परळी-93.85

आष्टी-93.38

अंबाजोगाई-93.03

बीड-90.67

पाटोदा-87.38

गेवराई-92.23

माजलगाव-86.88

केज-92.99

धारुर-86.80

शिरुर-88.17

वडवणी-90.73

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *