*ज्वारीसह रब्बी पिकांचा विमा उतरवून घ्या – पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन*
बीड (दि. २४) —- : रब्बी हंगाम २०२०-२१ साठी ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आदी पिकांचे विहित तारखेच्या आत शेतकऱ्यांनी पीकविमा भरून घ्यावा, ज्वारी पीकविमा भरण्याची मुदत ३० नोव्हेम्बर पर्यंत असून जिल्ह्यातील पात्र शेतकरी यापासून वंचित राहू नयेत असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. १७ जुलै २०२० च्या शासन निर्णयानुसार बीड जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या विमा संरक्षणासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार असे सर्व शेतकरी संलग्न ५ रब्बी पिकांचा विमा भरू शकतात. रब्बी हंगामातील ज्वारी (बागायत व जिरायत) साठी पीकविमा भरण्याची ३० नोव्हेंबर २०२० अंतिम मुदत असून, गहू, हरभरा व कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना गाव पातळीवर आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र याद्वारे पीकविमा भरता येईल, ही सर्व केंद्रे शनिवार – रविवार यासह सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवावीत असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान अंतिम तारखेची वाट न पाहता, शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या पेरणीनुसार पिकांचा विमा हफ्ता भरून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास संबंधित विमा कंपनीचे स्थानिक अधिकारी, तालुका कृषी विभागाचे अधिकारी – कर्मचारी यांची मदत घ्यावी असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.