ज्येष्ठ लेखककार उत्तम बंडू तुपे यांचं आज निधन
पुणे : आपल्या साहित्यातून उपेक्षित आणि ग्रामीण जीवनाचे चित्र करणारे ज्येष्ठ साहित्यिक व ‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे यांचं आज पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. तुपे हे गेल्या अनेक महिन्यापासून आजारी होते. त्यांची पत्नी जिजा यांचं काही महिन्यापूर्वीच निधन झालं होतं. उत्तम तुपे यांना दोन दिवसांपूर्वी जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुलं असा परिवार आहे. तब्बल १६ कादंबऱ्यांसह अनेक लघुकथांना शब्दरूप देणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांची ‘झुलवा’ ही कादंबरी प्रचंड गाजली. तेव्हापासून ते ‘झुलवा’कार म्हणूनच ओळखले जाऊ लागले. खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ, झावळ या त्यांच्या कादंबऱ्याही गाजल्या. अनेक कादंबऱ्यांना पुरस्कार मिळाले. ‘आंदण’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. ‘काट्यावरची पोटं’ या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला. ‘झुलवा’ कादंबरीला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.