Uncategorized

ज्यांच्या रक्तात जिव्हाळा नाही त्यांनी ऊसतोड कामगारांच्या संपात लुडबूड करू नये – राजेंद्र मस्के तुमचा मुक्काम पोस्ट मुंबईच आहे, हे विसरलात का ? •••

बीड दि. २९ ——-लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी पहिले पाऊल उचललं. कामगारांच्या न्याय हक्काचा लढा सुरू केला. ऊसतोड कामगारांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साखर सम्राट कारखानदारांसी संघर्ष केला. तोच वसा आणि वारसा घेऊन लोकनेत्या पंकजाताई मुंडे हया सातत्याने व प्रामाणिकपणे कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी लढा देत आहेत, त्यामुळे ज्यांच्या रक्तात जिव्हाळा नाही, त्यांनी ऊसतोड कामगारांच्या संपात लुडबुड करू नये असे सांगत तुमचा मुक्काम पोस्ट मुंबईच असतो हे विसरलात का? असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केला आहे. २०१४ मध्ये कामगारांचा संप पुकारून २५% मजुरीमध्ये वाढ मिळवण्यात पंकजाताईंचे कणखर नेतृत्व यशस्वी ठरले. त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारे संप फोडण्याचा प्रकार झाला होता. तरीही ताई तसूभरही मागे सरकल्या नाहीत. ऊसतोड कामगार हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. राजकारणाचा नाही. याचे भान काही नेत्यांना राहिले नाही. हवा वाहील त्या दिशेने राजकारण करणाऱ्या नेत्यांना फक्त प्रत्येक गोष्टीत राजकारण आणि स्वार्थ दिसतो. रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे राजकीय ढंग बदलून राजकारण करण्याची प्रवृत्ती जनतेच्या लक्षात आलेली आहे. लवादामध्ये व साखर कारखानदारांची बाजू मांडण्यासाठी शरद पवार साहेबांची निवड झाली तर सर्व कामगारांच्या एक मुखी पाठिंब्यावर कामगारांची बाजू मांडण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची निवड झाली. मुंडे साहेबांच्या साक्षीने ऊसतोड लवादासमोर अनेक निर्णय झाले. परिस्थितीनुसार मागण्याची स्वरूप बदलत असते. याचा अर्थ लवाद फसवा आहे हे म्हणणे चुकीचे असून असे म्हणणे म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या भूमिकेवर संशय घेण्यासारखे आहे.बुध्दीभेद करून कामगारांच्या मनात संभ्रम निर्माण करून ऊसतोड कामगारांचे दैवत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांवर संशय व्यक्त करण्याचा निर्लज्ज प्रकार होय. लवाद फसवा असल्याचा साक्षात्कार आजच स्वयंभू नेत्यांस कसा झाला ? हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. कोणत्याही कारणाने का होईना प्रसिद्धीत राहण्याची चटक काही नेत्यांना लागली आहे. ऊसतोड कामगारांचा तसा त्यांचा कोणताही संबंध नाही. त्यांच्या घरात कोणी कोयता घेऊन फडात गेलेले आठवत नाही.कामगारच काय कोणत्याही सामान्य माणसा विषयी आस्था नसणारा हा स्वयंभू नेता नेहमी व्यक्तिगत राजकारण करत असतो. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या कामगारांना मदतीचा हात देण्यासाठी स्वयंभू नेत्याचा आवाज निघाला ना मदतीसाठी हात पुढे आला अशी टीका मस्के यांनी केली आहे. तुमचा मुक्काम मुंबईच ! ————————- पंकजाताई मुंडे यांचा ऊसतोड कामगारांसाठी पोटतिडकीचा लढा चालू आहे असे सांगत मस्के यांनी संपात लुडबूड करणा-या नेत्याचा खरपूस समाचार घेतला. तुम्ही स्वतः मुंबईत बसून राजकारण हाकता..स्वतःच्या कार्यालयाचा पत्ता नाही आणि वरळीतील ऊसतोड ‌कार्यालयाचा पत्ता सापडत नाही अशी बोंब मारता. तुमचा मुक्काम पोस्ट मुंबईच आहे, पण ताईंची नाळ तळागाळातील जनतेशी आहे, तुम्हाला ते जन्मात जमणार नाही. मुंडे साहेब असताना स्वयंभू नेत्याला वरळीचा पत्ता बरोबर सापडत होता. आरक्षणाच्या नावावर किती वेळा पक्ष बदलले आणि आमदारकी मिळवली. आता ही भ्रष्टनिती सोडुन द्या. बोगस आंदोलन करण्याची सवय बंद करा.ऊसतोड कामगारांचा संप म्हणजे ऊसतोड कामगार मुकादम यांच्या लिलावाचा बाजार नाही याची जाणीव बोलबच्चन नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे. दहा पाच कार्यकर्त्यांसमोर भाषण ठोकल्याने ऊसतोड कामगारांचा नेता होता येत नाही. त्यासाठी सामान्य माणसाविषयी रक्तामध्ये जिव्हाळा असावा लागतो. केवळ राजकीय पुळका नको. सामाजिक चाड ठेवून असे बोगस कामगाराचे मेळावे घेणे बंद करा अशी टीका मस्के यांनी केली आहे. मुंडे साहेबांचे घरही मुंबईतच होते,तिथून ते प्रश्न हाताळत होते. तथापि पंकजाताई बाहेर देशात जाणार याची पूर्व कल्पना असल्याने जाण्यापूर्वीच सर्व बैठका घेऊन चर्चा करून त्या गेल्या आणि तिथे गेल्यावर सुध्दा पहाटे पाच वाजता उठून ऑनलाईन बैठकांना हजेरी लावली त्यामुळे ऊसतोड कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ताईंचे नेतृत्व समर्थ आहे, त्याची चिंता तुम्ही करू नका असा टोला जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी लगावला आहे. •

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *