#जोशींचीतासिका : मध्यरात्री हुल देण्यापेक्षा वेळेची रेखा पाळूनच होईल कोरोनावर वार…!

बीड जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसांत कॊरोनाने चांगलेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केलेत. पण, ती तटबंदी कोरोनाने ओलांडली तशी प्रशासनातील लूप होल्स दिसू लागलेत. याला वेळीच रोखता येऊ शकेल फक्त प्रशासनाने काही बाबतीतही योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य प्रमाणात शक्ती केंद्रित करणे आवश्यक आहे.

सन 2011 साली झालेल्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची लोकसंख्या ही 25,85,049 इतकी होती. आकडेमोडीसाठी आपण गृहीत धरू की दहा वर्षांत लोकसंख्येत काहीच फरक पडला नाही. लोकसंसख्या सुद्धा आजमितीस 25 लाख इतकीच गृहीत धरू. या अवाढव्य लोकसंख्येपैकी 21 मे पर्यंत 719 जणांचे जिल्ह्यात स्वॅब घेण्यात आले आहेत. थोडक्यात जिल्ह्यात अंदाजे 0.028% स्वॅब टेस्टिंग प्रमाण आहे.

21 मे 2020 च्या संध्याकाळपर्यंत या 719 पैकी 37 जणांचे कॊरोना अहवाल सकारात्मक आले आहेत. म्हणजे एकूण स्वॅब घेतलेल्या व्यक्तींपैकी 5.14% व्यक्ती कॊरोना पॉसीटीव्ह आढळून आल्या आहेत. राज्य सरकार दावा करत आहे की देशात सर्वात जास्त टेस्ट महाराष्ट्र करत आहे म्हणून बाधित रुग्णही मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. बीड जिल्हा याबाबत कुठे उभा ठाकला आहे याचा गंभीर विचार होणे आवश्यक आहे. वेळीच तपासणी संख्या वाढवणे अत्यावश्यक आहे.

प्रशासन चालवणे हे अत्यंत जिकिरीचे असते. तुम्हां आम्हां सामान्यांना काठावर बसून त्यांच्या कार्याच्या तळाचा अंदाज येणे कठीण असते. पण, काही गोष्टी प्रशासनास सहजशक्य आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आजवर परिस्थिती निश्चितच चांगल्या प्रकारे हाताळली आहे हे मान्य करावेच लागेल. मात्र, काही बाबतीत सुधारणेसाठी संधी आहे. जसे की जिल्हाधिकारी महोदय जे काही आदेश काढतात ते आजवर बहुतांश वेळा मध्यरात्रीच्या आसपास आले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि जनतेत समन्वयाचा अभाव दिसतो. पत्रकारही त्यामुळे हतबल आहेत कारण त्यांना अनेकजण प्रश्न विचारतात पण उत्तर कोणाकडेच नसते.

स्वॅब टेस्टिंग रिपोर्टसुद्धा उशीरा जाहीर होत आहेत. एक जेष्ठ पत्रकार महोदयांनी त्यांच्या घरची परिस्थिती सांगितली. काम आटोपून रात्री अकरा – साडे अकरा वाजता ते घरी गेले आणि त्यांचा फोन खणखणला. त्यांच्या झोपेत असलेल्या मंडळी त्यांचं फोनवरच बोलणं ओझरत ऐकून ताडकन उठून म्हणाल्या ‘किती आले पॉजिटीव्ह? कुठले कुठले आहेत पॉजिटीव्ह? आपल्या भागात आहे का काही?’ ज्यांना मटक्याच्या आकड्याबाबत ठाऊक आहे ते अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील. मटकेवाल्यांच्या भाषेत आकडा फुटला की ‘काय आला? काय आला?’ म्हणत जशी धांदल उडते तशी अवस्था सामान्यांची झाली आहे. रात्री उशिरा कितीही वाजले तरी काळजीने ‘आकड्याची’ वाट बघण्याची काहींना सवय झालीय तर काहीजण उद्यासाठी काय आदेश म्हणून डोळे लावून बसलेले असतात.

लॉकडाऊन जसेजसे वाढत आहे तशी तशी शिथिलता केंद्र, राज्य पातळीवर दिली जात आहे. बीड जिल्ह्याचे दुर्दैव असे की जेव्हा आधी रुग्ण नव्हते तेव्हा निर्बंध कडक होते. आता हळूहळू रुग्ण संख्या वाढत आहे सोबत लॉकडाऊन नियम शिथिल होत आहेत. पोलीस आणि वैद्यकीय व्यवस्था त्यांच्या मर्यादित साधन व मनुष्यबळामुळे थकत चालल्यात. शेवटी पोलिस, वैद्यकीय, महसूल, वीज वितरण आदी कर्मचाऱ्यांना जीव आहे, कुटुंबाची काळजी आहे त्यामुळे ते सुद्धा अस्वस्थ आहेत. त्यांचे मनोबल टिकून रहावे म्हणूनही जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

इंदिरा बाईंचे ब्रीदवाक्य होते ‘हर पल हर समय कडी मेहनत’. रेखावार हे निश्चितच मेहनती आहेत पण वेळेचे बंधन पाळले तर त्यांचेच काम अधिक सोपे आणि परिणामकारक होईल. सतत मध्यरात्री हुल देण्यापेक्षा वेळेची रेखा पाळूनच कोरोनावर वार करता येऊ शकेल. दरदिवशी एक ठराविक वेळ निश्चित करून दिवसभराचा अहवाल आणि पुढील कालावधीसाठी लागू असलेले आदेश त्यांनी जाहीर केले तर ‘सबकी सुरक्षा, सबका भला’ सहजसाध्य असेल. जनसामान्यांची ‘मन की बात’ घेऊन पुन्हा योग्य वेळी हजर होईन तोवर पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

जाता जाता
या कोरोनाच्या संकटात पालकमंत्री धंनजय मुंडेंना जिल्ह्यावर पकड निर्माण करण्याची नामी संधी आहे. अजूनतरी त्यांची यंत्रणा त्याबाबत सजग झाल्याचे दिसत नाही. ऊसतोड कामगारांचे विक्रमी स्थलांतर करण्यात ते यशस्वी झालेत, सोबत गरजूंना अन्नधान्य वाटपाची आघाडी त्यांनी चांगल्याप्रकारे सांभाळली आहे. पण, भाऊ तुम्ही मुंडे साहेबांचे वारसदार आहात. अजित दादांचे अनुयायी आहात. पालकमंत्री म्हणून वेळीच प्रशासनाला आवर घालणे क्रमप्राप्त आहे. बीडमध्ये पोलिसांनी व्यापाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी संबंधित पोलिसांवर झालेल्या कारवाईत तुम्ही प्रयत्न करून तसेच तुम्ही सरकारमध्ये असताना आ. विनायक मेटे भाव खाऊन गेले.

लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्यावर चित्रित त्यांच्याच आवाजात एक गाणे आहे, त्याचा जरूर विचार व्हावा;

तू ऐकत असता जयघोषांचे नारे
या कालगतीचे नकोच विसरू वारे
फटकार अचूक तू चेंडू या काळाचा
आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा
निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणकणाला
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला!

या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला?
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला!

एखादा फलंदाज षटकार खेचतो तेव्हा स्टेडियमवर जल्लोष होत असतो. तो शतकाच्या जवळ असतो आणि तेवढ्यात एक खतरनाक चेंडू येतो. बॅट चाटून जातो आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातात विसावतो. त्यावेळी त्याने आधी किती छान फलंदाजी केलीय हे बघितले जात नाही. बाद घोषित केले जाते.

त्याच गाण्यात एक छान उदाहरण आहे;

काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी
भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी
मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव
या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुजला धाव
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला!

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनावरची तुमची मांड अजून घट्ट असणे जनसामान्यांसाठी अत्यावश्यक आहे. त्यात तुम्ही यशस्वी व्हाल यात कोणतीही शंका नाही. जनतेचा तुमच्यावरील विश्वास तुमच्या कामातून अजून दृढ व्हावा यासाठी शुभेच्छा.

जय हिंद,
अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ
चलभाष क्र. 8983555657
दि. 22 मे 2020

COVID19 #TimeManagement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *