जोशींचीतासिका : काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवारी मागची खेळी…!

परळी : 21 मे रोजी होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीत 9 जण आमदार होतील. त्यात आता चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी काळातील सौदेबाजीची पायाभरणी घातली जाईल. मुळात या निवडणुका कोणत्या परिस्थितीत लागल्या त्याबद्दल बरेच चर्वितचर्वण झाले त्यामुळे त्यावर भाष्य न करता मूळ मुद्द्यांवर येऊ.

साधारणपणे एक उमेदवार निवडून यायला प्रथम क्रमांक पसंतीची साधारणपणे 29 मत लागणार आहेत. भाजप आणि त्यांचे सहयोगी मिळून त्यांच्याकडे 117 च्या आसपास संख्याबळ आहे असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे त्याचे चारही उमेदवार निवडून येणे अशक्यप्राय नसेल. सेनेचे 56 आमदार आहेत त्यामुळे दोन मते जुळवून उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद व निलम गोऱ्हे यांचे उपसभापती पद सेना आरामात टिकवू शकते.

राष्ट्रवादी काँग्रेस 54 आमदार अधिक 4 मते मिळवून दोन जागा जिंकू शकते. पण, 44 संख्याबळ असलेल्या काँग्रेसने आधी राजेश राठोड यांचे नावं दिल्लीवरून जाहीर केले पत्र प्रसिद्ध केलं. पण, काही वेळातच राजकिशोर उर्फ पापा मोदींचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून जाहीर केले. यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या की काँग्रेस 14 जागा कशा जुळवणार?

मुळात काँग्रेसने दुसरा उमेदवार का उभा केला असेल हे तपासायला हवे. त्याची मीमांसा होणे गरजेचे आहे. फॉर्म वापस घेण्याची तारीख 14 मे आहे. तोपर्यंत अनेक घडामोडी घडतील. पण, काँग्रेसचा दावा असणार की सध्या सरकारमध्ये काँग्रेसकडे सेना व राष्ट्रवादीच्या तुलनेत कमी प्रतिनिधित्व आहे. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने सामोपचाराने वागत कसलाच क्लेम केला नाही. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या निवडीत काँग्रेस 6 जागांचा वाटा मागू शकते. तर सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी 3 जागा घ्याव्यात असा प्रस्ताव काँग्रेसचा असू शकतो.

आता काँग्रेसच्या दोन उमेदवारात जो कोणी उमेदवारी वापस घेईल त्याची पुढच्याच महिन्यात नियुक्ती करून त्या व्यक्तीचेही काही दिवसांत समाधान करणे काँग्रेसला शक्य असेल. तुर्तास राठोड व मोदी यांच्यात कोण उमेदवारी वापस घ्यावी असा प्रश्न निर्माण झाला तर ते नावं राजकिशोर मोदी यांचे असेल. त्याचे कारण म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने (AICC) आधी राजेश राठोड यांचे नावं अधिकृतरित्या जाहीर केले. तसेच बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करताना “बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे.” असा मोदी यांचा उल्लेख केला आहे. राज्यपाल नियुक्तीसाठी सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला नियुक्त करता येते त्यामुळे मोदी पुढील महिन्यात सहज आमदार होऊ शकतात.

अशा परिस्थितीत आघाडीकडून 5 तर भाजपकडून 4 उमेदवार झाल्याने 9 जागा बिनविरोध होऊन हा खेळ 14 मे रोजी संपुष्टात येऊ शकतो. मात्र, भाजपसारखा बेरकी पक्ष पाचवा उमेदवार म्हणून कोणी लक्ष्मीपुत्र उभा करून महाआघाडीत अस्वस्थता निर्माण करू शकतो. भाजप पुरस्कृत पाचवा उमेदवार हा जिंकण्यासाठी नसून आघाडीत संशयाचे भूत निर्माण करू शकतो. सध्या भाजपला गमावण्यासारखे काहीच नाही. ते खेळ म्हणून खेळी करू शकतात.

काँग्रेसने दुसरा उमेदवार देऊन जो गियर शिफ्ट केला तो आगामी काळातील नवीन राजकीय घडामोडींचे बीज टाकणारा असेल हे नक्की.

जय हिंद,
अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ
8983555657

305 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *