#जोशींचीतासिका ; आयुष्याची व्हॅलीडीटी किती?
माझे एक मित्र Anup Bhansali लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दररोज श्री श्री रविशंकर जे ऑनलाईन ध्यान घेतात त्यात सहभागी होत आहेत. दोन तीन दिवसांपूर्वी त्यांच्या पुतण्या आणि मुलींसह ध्यानात असताना त्यांच्या मनात एक विचार आला. तो घेऊनच आज थोडंस लिहावं वाटलं.
मानवजाती ही सृष्टी रचयीत्यासाठी जणू मोबाइल फोनच आहे त्याने प्रत्येकला रिचार्ज मारूनच पाठविले आहे. प्रत्येकाची व्हॅलिडिटी वेगळी आहे. कोरोना नावाच्या व्हायरस अटॅक नंतर तर प्रत्येकाची व्हॅलीडीटी चेंज झाली आहे.
2004-2005 मध्ये रिलायन्सने त्यांच्या CDMA नावाच्या मोबाईलमध्ये लाईफ टाईम व्हॅलीडीटी नावाचा प्रकार आणला होता. जरा आठवा त्यांनंतर बहुतेक कंपन्यांनी तो प्रकार अनुसरला होता. त्यावेळी आपण जो फॉर्म भरून द्यायचो त्यात प्लॅन एक्सपायरी डेट 2020 साल लिहिलेलं असायचं. पण, ते वाचल्याचं फार कमी जणांना आठवत असेल.
बहुतेकांनी त्या काळात फक्त अनलिमिटेड कॉलसाठी तो प्लॅन घेण्यासाठी उड्या मारल्या होत्या. प्रत्येकाचा हिशेब साधा होता वर्ष किंवा दोन वर्षे जरी काम भागलं तरी बस्स. आपलंही तसच झालं आहे. आपण सारे आपल्या भौतिक सुखांत इतके मग्न झालो होतो की आपल्यापैकी प्रत्येकाला हाव सुटली होती. पण, कॊरोना नावाचा एक व्हायरस प्रत्येकाच्या आयुष्यात आला आणि त्याने प्रत्येकाच्या आयुष्याचा मोबाईल हँग केलाय.
आधी पायी चालणारा दुचाकीस्वाराचा हेवा करायचा. दुचाकीवाला चारचाकीवाल्याकडे बघून जळायचा. तर चारचाकीवाला पोर्षे, मर्सिडीज, बीएमडब्ल्यूकडे बघत डोळे विस्फारून बघायचा. तर अतिश्रीमंत हेलिकॉप्टर, विमानात बसून आपल्याकडे चार्टर्ड प्लेन नाहीत म्हणून दुःखात असायचे. मात्र, अवघ्या काही दिवसांत निसर्गचक्र असे काही फिरले की सगळे ज्या त्या ठिकाणी टाळेबंद झाले.
निसर्ग संकेत देतोय की वेळ आली आहे ज्याने त्याने आपले सॉफ्टवेअर स्वतःच अपडेट करण्याची. जगात दोन गोष्टी कायम लक्षात असू द्याव्यात की आपल्यापासून सर्वात लांब कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे गेलेला क्षण आहे आणि सर्वात जवळ कोण असेल तर त्याचं नावं मृत्यू आहे. कारण पुढच्या क्षणी आपण श्वास घेऊ की नाही हे कोणालाच ठाऊक नाही. व्हेंटिलेटरवर फक्त प्रयत्न करता येतील, शाश्वती कोणताही डॉक्टर देऊ शकत नाही.
नवीन पिढीच्या मंडळींनी कहो ना प्यार हैं नावाच्या चित्रपटात हृतिक रोशनवर चित्रित गाण्याचे बोल आठवा
एक पल का जीना, फिर तो हैं जाना,
तोफा क्या केले जाये, दिल ये बताना।
खाली हात आये थे हम,
खाली हात जायेंगे।।
जुन्या पिढीतील लोक अजिझ नाझाच्या ‘चढता सूरज धिरे धिरे’ कव्वालीतील बोलांसोबत कोरिलेट करू शकतील.
तू यहाँ मुसाफ़िर है, ये सराये फ़ानी है,
चार रोज की मेहमां तेरी ज़िन्दगानी है।
ज़र ज़मीं ज़र ज़ेवर कुछ ना साथ जायेगा,
खाली हाथ आया है खाली हाथ जायेगा।।
जानकर भी अन्जाना बन रहा है दीवाने।
वेळ आली आहे आपल्या आधाशी पणाच्या व्हायरसपासून कायमस्वरूपी सोशल डिस्टन्स ठेवून स्वयंनिर्धाररुपी मास्क वापरून आपापल्या मोबाईलचे सॉफ्टवेअर अपडेट करून आत्मनिर्भर होण्याची. हे जग म्हणजे एकप्रकारचे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन आहे. तिथे सारे व्हायरसग्रस्त झाले आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या झाले तर काय होईल याचा विचार ज्याचा त्याने करावा.
त्यामुळे तुमच्या मोबाईलरुपी आयुष्याची व्हॅलीडीटी किती? याचे उत्तर ज्याच्या त्याच्याजवळ आहे.
जय गुरूदेव
जय हिंद,
अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ
दि. 20 मे 2020