जालना बाजार समितीत कापूस खरेदीचा शुभारंभ: सी. सी. आय तर्फे ५१४०ते ५३५५ भाव – माजी मंत्री अर्जुनराव खोतकर

जालना : राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे राहणारे असून कर्जमाफी असो वा अनुदान, तसेच आपत्कालीन स्थितीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतमाल खरेदीचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मोठा आधार दिला असून आम्ही कर्तव्य भावनेने साथ देत आहोत. अशी माहिती शिवसेना नेते, माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी आज येथे बोलतांना दिली. सी. सी. आय. तर्फे  ओलाव्याच्या प्रतवारी नुसार कापसास प्रती क्विंटल ५१४० ते ५३५५ रू. भाव दिला जात आहे. 
 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल घोषणा करताच जालना कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सी. सी. आय. मार्फत कापूस खरेदी चा शुभारंभ सोमवारी ( ता. २७) सभापती अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी  जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण,सहाय्यक निबंधक शरद तनपुरे,सी.सी.आय.चे अधिकारी हेमंत ठाकरे,युवा सेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर,बाजार समिती चे संचालक अनिल सोनी, भाऊसाहेब घुगे, गोपाल काबलिये, पंडित भुतेकर, बाजार समिती चे सचिव रजनीकांत इंगळे, प्रभाकर जाधव, पर्यवेक्षक अनिल खंडाळे, मोहन राठोड, राहुल तायडे, संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 
माजी मंत्री अर्जुनराव खोतकर पुढे म्हणाले की, तुर व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे धान्य उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटली. मात्र पांढरे सोने असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मांडलेल्या  व्यथा आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत खरेदी – विक्री रखडल्याने अडचणीत आलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने खरेदी- विक्री केंद्र सुरू करावेत अशी आग्रही मागणी केली होती. असे सांगून खोतकर म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कालच शेतमाल खरेदीचे आदेश देऊन हे सरकार शेतकऱ्यांचेच  असल्याचे दाखवून दिले. असे अर्जुनराव खोतकर यांनी नमूद केले. आम्ही मुख्यमंत्र्यांना साथ देत आहोत. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत ७,३०८ शेतकऱ्यांनी नोंदी केल्या असून ३०एप्रिल पर्यंत नोंदणी करता येईल. गर्दी न करता सोशल डिस्टन्स चे पालन करत शेतकऱ्यांनी आपला कापूस मार्केट यार्ड परिसरात  विक्रीसाठी आणावा. असे आवाहन ही अर्जुनराव खोतकर यांनी केले. या वेळी सी. सी. आय. नाफेड, बाजार समिती चे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *