जनता कर्फ्यू मधून गंगाखेड शहर वगळा – गोविंद यादव
गंगाखेड : परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात पाच दिवसांच्या जनता कर्फ्यू ची घोषणा केली आहे. गंगाखेड शहरातील व्यापाऱ्यांनी मागील आठवड्यातच चार दिवसांचा स्वयंस्फूर्त बंद पाळला होता. म्हणून या जनता कर्फ्यू मधून गंगाखेड शहरास वगळण्यात यावे, अशी मागणी गंगाखेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मागील आठवड्यात दिनांक १७ ते २० सप्टेंबर दरम्यान शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येवून जनता कर्फ्यू पाळला. या काळात गंगाखेड शहरातील सर्व मोठे व्यापार प्रतिष्ठाणे बंद होती. या बंदची मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याने ग्रामिण भागातील नागरिकही या काळात शहरात आले नाहीत. आता दिनांक २६ सप्टेंबर पासून जिल्हाधिकाऱ्यांनी पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. हा कर्फ्यू गंगाखेडकरांनाही लागू झाल्यास गंगाखेड बाजारपेठेस पंधरा दिवसात दहा दिवसांचा बंद सोसावा लागणार आहे. म्हणून या जनता कर्फ्यूतून गंगाखेड शहराला वगळण्यात यावे, अशी मागणी गोविंद यादव यांनी प्रशासनाकडे केली आहे. जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात, याकडे शहर आणि तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात आपण ट्विट आणि ईतर माध्यमांतून जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून ऊद्या त्यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याची माहीती गोविंद यादव यांनी दिली आहे.