गोपीनाथ गडावर गर्दी जमा करणे पडले महागात ; आ.रमेश कराड यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल

परळी : तालुक्यातील गोपीनाथ गड (पांगरी कॅम्प) येथे भाजपचे नावनिर्वाचित विधान परिषदेचे सदस्य रमेश कराड यांनी आज (दि.21) सकाळी 11.30 च्या सुमारास स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश झुगारून जमाव करून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यासह 22 जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नाईक विष्णू सुबराव घुगे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटल्या प्रमाणे आ.रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे पोलीस प्रशासनास कसलीही पूर्व कल्पना न देता अचानकपणे दर्शनास येऊन लोक जमा केले. यावेळी त्यांच्या समवेत भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनी कराड, डॉ. बालासाहेब कराड, जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, दिनकर मुंडे, (सर्व रा.परळी), विठ्ठल मुंडे (रा.लिंबोटा) यांच्यासह 10 ते 15 लोक होते. या सर्वांनी जीवितास धोका असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग पसरेल ही माहिती असतानाही जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे व प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्या विरोधात वरिष्ठांच्या सूचनेवरून घुगे यांनी फिर्याद नोंदवली. या प्रकरणी कलम 143, 188, 269, 270, 271, भादवीसह कलम 51 (ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सपोनि. शहाणे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *