खुनाच्या गुन्ह्यातील कोरोनाबाधित आरोपी रुग्णालयातून पसार
केज : तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील पुजाऱ्याच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कोरोनाबाधित आरोपीने आज सकाळी कोव्हिड केअर सेंटरमधून पलायन केल्याच्या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळून जाण्याची चार दिवसातील ही द्सुरी घटना आहे. शनिवारी (दि. २५) एका कुख्यात दरोडेखोराने बीडच्या कोव्हिड केअर सेंटरमधून पलायन केल्याच्या घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनांस बसलेला हा दुसरा धक्का आहे.
केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील पुजाऱ्याच्या खून प्रकरणात पोलिसांनी ११ जुलै रोजी इटकुर (ता.कळंब,जि. उस्मानाबाद) येथून या आरोपीस ताब्यात घेतले होते.दरम्यानच्या काळात त्याची कोरोना चाचणी झाली होती, अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात २२ जुलैपासून उपचार सुरू होते.सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित आरोपी रुग्णाला सौम्य लक्षणे असल्याने त्यास आयआयटी येथे केअर सेंटरमध्ये दाखल केले जाणार होते. मात्र त्यापूर्वी त्याने आज बुधवारी सकाळी ड्युटीवरील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केले.हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनासह पोलिसात खळबळ उडाली आहे. दरम्यान चार दिवसात गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपी फरार झाल्याने रुग्णालय आणि आयटीआय येथील।कोव्हीड केअर सेंटरमध्ये सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.