कोरोनाच्या संकटामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा धनंजय मुंडे यांचा निर्णय

परळी (दि. १३) —- : बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे, यातून मुक्त होण्यासाठी सर्वांनी आहेत तिथेच राहून प्रयत्न करावेत, याच माझ्यासाठी या वर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी येत्या १५ जुलै रोजी असलेला त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून, या दिवशी कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन आपल्या समर्थक/चाहत्यांना केले आहे. धनंजय मुंडे यांच्या तगड्या जनसंपर्कामुळे राज्यात त्यांचे लाखो चाहते आहेत, दरवर्षी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांचा वाढदिवस समर्थक साजरा करतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे सर्वत्र परिस्थिती गंभीर असून परळी शहर देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वांची सुरक्षा आपल्यासाठी जास्त महत्वाची असल्याचे ना. मुंडे म्हणाले. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा – आशीर्वाद मला लढण्याचे बळ देतात, परंतु यावर्षी कोरोनाशी लढण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर असून, त्यासाठी आपण सर्वांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद माझ्या सोबत आहेतच, कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करू नये, आहेत तिथेच राहून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, कोरोनाला बीड जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून कायमचे हद्दपार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, याच माझ्यासाठी यावर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील असे ना. मुंडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *