केंद्र सरकारने तात्काळ पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत – अॅड.अनिल मुंडे
परळी : केंद्र सरकारने इंधन दर वाढ तात्काळ रद्द करून देशातील सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा. अशी मागणी परळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.अनिल मुंडे यांनी देशाच्या राष्ट्रपतींना उपजिल्हा अधिकारी यांच्या मार्फत ३० जून रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
परळी तालुका काँग्रेस कमिटीच्या निवेदनात म्हटले आहे की, येत्या एक महिन्या पासून दररोज पेट्रोल डिझेल दर वाढ होत असून त्यामुळे पेट्रोल, डिझेल आता सर्व सामान्यांना न परवडणारे असे झाले आहे. सध्या देश गंभीर संकटाचा सामना करत असतांना मोदी सरकार इंधन दरवाढ करून नफेखोरी करत आहे. हि अत्यंत गंभीर बाब असून एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, देशातील उद्योग-धंदे बंद पडले आहेत, असंख्य मजुरांचा रोजगार गेला, मजुरांच्या हाताला काम नाही, कित्येक युवकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारी अतिउच्च पातळीला पोहोचली आहे. अशा कठीण प्रसंगी इंधन दरवाढ करून सरकार आपला खिसा भरून गलेलठ्ठ होत आहे.
त्यामुळे तात्काळ केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल चे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. अन्यथा या प्रश्नी परळी तालुका काँग्रेसच्या वतीने आगामी काळात फिजिकल डिस्टेंस ठेऊन तसेच मास्क लावून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदरील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सदरील निवेदनावर परळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.अनिल मुंडे, प्रकाशराव देशमुख माजी शहर अध्यक्ष, विजयप्रसाद अवस्थी प्रवक्ते काँग्रेस, अॅड.डी. पी. कडभाने सचिव किसान सेल काँग्रेस मराठवाडा सौन्दळे तर अॅड.शशी शेखर चौधरी, शुभशराव देशमुख, कृष्ण जाधव, गुणाजी फड, जावेद पाशाभाई, श्रीराम घोडके व इतर जणांनी निवेदनावर सह्या केल्या.